लघुकथा – फुगेवाला
संध्याकाळची वेळ होती. समीर उद्यानातल्या नेहमीच्या बाकावर बसला होता. बाजूला खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट होता, पण त्याच्या मनात मात्र गडद शांतता दाटून आली होती. महिनाभरापूर्वी पत्नी स्वातीच्या अपघाती निधनानंतर आयुष्यच उघड्यावर पडलं होतं. तेव्हापासून तो रोज संध्याकाळी छोट्या अनुला घेऊन इथे यायचा, कारण हेच स्वातीचे आवडते ठिकाण होतं.
तेव्हड्यात, एक किरकोळ शरीराचा, मळकट कपड्यांतला मुलगा समोर आला. त्याच्या हातात रंगीबेरंगी फुग्यांचा गुच्छ होता.
"साहेब, फुगा घ्या ना! बघा, किती सुंदर आहेत!" तो उत्साहाने म्हणाला.
समीरने नाराज नजरेने त्याच्याकडे पाहिलं. "मला नकोय फुगा, जा तू!" तो कडवटपणे म्हणाला.
"पप्पा, मला हवा तो लाल फुगा!" अनुने चिमुकल्या हाताने मागणी केली.
अनुची इच्छा मोडणं त्याला शक्य नव्हतं. त्याने खिशातून दहा रुपयांची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातावर ठेवली.
"धन्यवाद, साहेब!" तो आनंदाने म्हणाला आणि पुढे गेला.
पण समीरच्या मनात चीड दाटून आली. गेल्या काही दिवसांपासून हा मुलगा रोज त्याच्याकडे येत होता, त्याची शांतता भंग करत होता. त्याने ठरवलं— उद्यापासून या बाकावर बसायचं नाही!
समीर उद्यानातल्या दुसऱ्या कोपऱ्यात बसला. काही वेळ शांततेत गेला, तेवढ्यात तोच मुलगा समोर उभा राहिला.
"अहो, साहेब, तुम्ही इथे? मी समजलो, आज तुम्ही आला नाहीत." तो पुन्हा फुगे पुढे करत म्हणाला, "आज छोटीला कोणता रंग हवा?"
समीरचा संयम सुटला. "अरे, का रोज पाठलाग करतोयस माझा? मला त्रास द्यायला मुद्दाम येतोस का?"
मुलाच्या चेहऱ्यावर वेदनेची झळक उमटली.
"साहेब, गरिबी माझाही रोज पाठलाग करत असते..." तो थोड्या शांत आवाजात म्हणाला. "गेल्या महिन्यात अपघातात आई-बाबा गेले. आता लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. तिच्या शाळेची फी भरायची आहे, म्हणून हे फुगे विकतोय."
समीर स्तब्ध झाला. आपलं दुःख त्याला मोठं वाटत होतं, पण समोर उभ्या असलेल्या या मुलाचा लढा किती खडतर होता! त्याने खिशातून पन्नासची नोट काढली आणि त्या मुलाच्या हातात दिली.
"हे ठेव, तुझ्या शाळेसाठी."
मुलाने नकारार्थी मान हलवली.
"साहेब, मी गरीब आहे, पण भिकारी नाही. जर मदतच करायची असेल, तर एकच करा— यापुढे कोणत्याही गरीबाला अपमानित करू नका."
हे बोलून तो निघून गेला. समीर त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला. त्या छोट्याशा मुलाने त्याला मोठा धडा शिकवला होता— दुःख कुणालाही असू शकतं, पण प्रत्येकाचं लढण्याचं धैर्य वेगळं असतं.
त्या दिवशी समीरने पहिल्यांदा त्या फुगेवाल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं… तो एक विक्रेता नव्हता, तर परिस्थितीशी झगडणारा एक लढवय्या होता!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०३/२०२५ वेळ : १४:४९
Post a Comment