कित्येक दिवसांनी ती घराबाहेर पडली होती. वाटेत तिला जाणवलं, कुणीतरी तिच्या मागे आहे. मात्र, मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. नंदिता आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली आणि जुन्या आठवणींमध्ये रममाण झाली.
"सगळ्यांनी ऐका, नंदिताला कोणी काही बोलायचं नाही. नाहीतर माझ्याइतकं वाईट कोणी नसेल!" आजी ठामपणे म्हणाली. "अहो आजी, तुम्ही नंदिताचे इतके लाड केलेत की तिला आपण राजकन्या असल्यासारखं वाटतंय!" नंदिताच्या वहिनीने नाक मुरडत म्हटलं.
घरात आई, बाबा, दादा, वहिनी, आजी आणि नंदिता – एवढीच माणसं होती. रोजचं जेवणखाणं आटोपून सगळे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले. नंदिता मात्र आजीसोबत तिच्या खोलीकडे वळली. आजीसोबत जेवण, आजीसोबत झोपणं – हेच तिचं संपूर्ण विश्व होतं. अचानक आजी आजारी पडल्या. थोड्याच दिवसांत त्यांची तब्येत ढासळली आणि अवघ्या दहा दिवसांत त्या अनंतात विलीन झाल्या.
आजी गेल्यावर घरात निरव शांतता पसरली होती. फक्त तिच्या आठवणींची सावली भिंतींवर रेंगाळत होती. नंदिता खूप एकटी पडली. तिला आजीचा सहवास, तिच्या कुशीतली माया आणि तिच्या स्पर्शाचा उबदारपणा पुन्हा अनुभवायचा होता. तिच्या वेदना समजून घेणारं, तिच्या डोळ्यांतील आसवं पुसणारं कोणीच नव्हतं. नंदिता आता फार गंभीर झाली. ती दुःखातून अजूनही पुरती सावरली नव्हती, तोच आणखी एक आघात – आई हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निघून गेली!
आता बाबा एकटे उरले. जी नंदिता स्वयंपाकघरात कधीच गेली नव्हती, ती आता बाबांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत होती. कारण आजी सोडून गेल्यामुळे एकटेपणाचं भय तिनं अनुभवलं होतं. तिला आपल्या बाबांसाठी आता आई व्हायचं होतं. त्यांना खाऊपिऊ घालायचं होतं. त्यांची काळजी घ्यायची होती. आता हेच तिचं आयुष्य झालं होतं. दादा आणि वहिनी होते, पण ते त्यांच्या कामात व्यग्र होते.
एक दिवस नंदिताला अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावं लागलं. पहाटे चारचा सुमार होता. बाबा गाढ झोपेत होते, त्यामुळे त्यांना न सांगताच ती घराबाहेर पडली. रस्त्यावर गूढ शांतता पसरली होती. धुकट वाऱ्यात अंधार अजूनही हलका होत नव्हता. ती ऑटो रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे निघाली. स्टेशनवर पोहोचताच उद्घोषणा झाली – "गाडी क्रमांक …… फलाट क्रमांक …… वर येत आहे." त्या आवाजाने नंदिता भानावर आली. आजीची लाडकी, त्यांच्या स्पर्शाची, त्यांच्या मायेची आस लावून बसलेली नंदिता स्वतःलाच घट्ट मिठी मारत पुढे चालू लागली. एका हरवलेल्या मायेसाठी… आपल्या अस्तित्वाच्या शोधात… त्या उबदार मिठीच्या आठवणीत…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०३/२०२५ वेळ : ०५:१३
Post a Comment