कविता - नवचैतन्याची गुढी

कविता - नवचैतन्याची गुढी

गुढी उभारू ज्ञानाची, 

ज्योत पेटवू संस्कारांची। 

सृजनशक्तीच्या तेजाने, 

सजवू पहाट नवचैतन्याची।।


सुवर्णकिरणांच्या फुलांचा, 

स्नेहसुगंध दरवळू दे। 

चैतन्याची वसंतमाला, 

स्वप्नांनी साजरी करू दे।।


शब्दफुलांची आरास ठेऊ, 

संस्कृतीच्या मखरात। 

विचारांची शुभ्र पताका, 

स्वर्गीय करू या क्षणात।।


शब्द, श्रद्धा, संस्कारांनी, 

समृद्ध होवो ही भूमी। 

मांगल्याची ही गुढी, 

नव्हे केवळ उत्सवी झुलमी।।


संकल्पांचे तेज हसावे, 

कर्तृत्वाने नभ सजावे। 

समृद्धीच्या या वैभवाने, 

स्नेहबंध सुदृढ व्हावे।।


स्नेह, समता, संपन्नतेचा, 

सोहळा फुलू दे घरोघरी। 

नवप्रभेच्या किरणांनी, 

आशेची गुढी उभारू खरी।।


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : ३०/०३/२०२५ वेळ : ०७:४२

Post a Comment

Previous Post Next Post