बरे नव्हे उदास होणे
बरे नव्हे उदास होणे
मित्र संग सदा असावा
कण्हत कण्हत उगाच जगणे
वास्तवाचा स्पर्श असावा
नसत्या शंका, उगा दुरावा
मना पोखरे, रोग जडावा ?
चण्ड तळपता निवतो नंतर
चंद्र शीतल अनुभवावा
मेघ गर्जती, वीज कोसळे
नंतर वाहे अभ्रांतुन पाणी
खळखळणारा निर्झर गातो
निर्मळ आपुलकीची गाणी.
दुःख संपले, सरे यातना
पशु, पक्षी , लता, तरु
वदती तुजसाठी गाताना
मैत्र तुझे कसे विसरू ?
हास वेड्या, हास ना !
आमच्या संगे बोल, ना !
गोड किती हसलास तू !
आता सखा भासलास तू !
©हेमलता देशपांडे, पुणे
रसग्रहण - बरे नव्हे उदास होणे
ज्येष्ठ कवयित्री हेमलता देशपांडे यांची "बरे नव्हे उदास होणे" ही कविता आशयघन, भावनाप्रधान आणि आत्मीयतेने नटलेली आहे. मैत्रीचे सौंदर्य, जीवनातील चढ-उतार, आशावाद, आणि सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्यांचा सुंदर संगम या कवितेत आहे. प्रत्येक कडव्यात वेगवेगळ्या भावना आणि जीवनातील सत्याची अनुभूती मिळते.
"बरे नव्हे उदास होणे
मित्र संग सदा असावा
कण्हत कण्हत उगाच जगणे
वास्तवाचा स्पर्श असावा"
या कडव्यात जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन प्रकर्षाने दिसतो. निराश होऊन जगण्यात काहीच अर्थ नाही, कारण मित्र सोबत असला की, कोणताही काळ कठीण वाटत नाही. कण्हत-कण्हत दिवस ढकलण्यापेक्षा वास्तवाचा स्पर्श करून आनंदाने जगावे, असा संदेश आहे. जीवन जगण्याची सकारात्मक उर्मी आणि मैत्रीचे महत्त्व ह्या ओळींमध्ये विषद केले आहे.
"नसत्या शंका, उगा दुरावा
मना पोखरे, रोग जडावा ?
चण्ड तळपता निवतो नंतर
चंद्र शीतल अनुभवावा"
मैत्रीत गैरसमज, दुरावा आणि अनावश्यक शंका निर्माण झाल्या तर त्या मन पोखरतात, त्या मन:शांतीचा नाश करतात. पण ही अवस्था तात्पुरती असते, कारण जसे चंड सूर्यासारखा तापटपणा असला तरी तो मावळतोच, तसेच राग आणि गैरसमजही विरून जातात आणि चंद्रासारखी शीतलता अनुभवता येते. गैरसमज, संताप आणि दुरावा क्षणिक असतो, मैत्रीचे बंध टिकून राहतात असं कवयित्री किती सहज सांगून जातात.
"मेघ गर्जती, वीज कोसळे
नंतर वाहे अभ्रांतुन पाणी
खळखळणारा निर्झर गातो
निर्मळ आपुलकीची गाणी."
जीवनातील संकटे आणि अडचणी क्षणिक असतात. मेघ गडगडतात, वीज कोसळते, पण शेवटी तिथूनच पावसाचे निर्मळ पाणी वाहते. त्याचप्रमाणे, नातेसंबंधांत कितीही चढ-उतार आले तरी त्यातूनच प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची सुंदर गाणी उमटतात. संघर्षानंतर येणारी शांती, प्रेम आणि समजूतदारपणा ह्या ओळींमध्ये किती संयतपणे मांडला आहे.
"दुःख संपले, सरे यातना
पशु, पक्षी, लता, तरु
वदती तुजसाठी गाताना
मैत्र तुझे कसे विसरू?"
इथे मैत्रीचा गहिरा भाव व्यक्त झाला आहे. दुःख आणि वेदना संपल्यावर निसर्गही नव्या उर्जेने भारलेला वाटतो. पशु-पक्षी, झाडे-फुले साऱ्यांच्या माध्यमातून मैत्रीचे धागे नव्याने गुंफले जात आहेत. आपल्या प्रिय मित्राची आठवण सतत येत राहते. खरी मैत्री कधीच विसरली जात नाही, ती निसर्गाइतकीच चिरंतन असते. मैत्रीचे अमरत्व आणि निसर्गाशी त्याचा भावनिक संबंध अगदी अलवार जोडला आहे.
"हास वेड्या, हास ना !
आमच्या संगे बोल, ना !
गोड किती हसलास तू !
आता सखा भासलास तू !"
या ओळींमध्ये खऱ्या मैत्रीचा उत्कट भाव आहे. मित्राच्या हास्याची आठवण, त्याच्या उपस्थितीने आलेला आनंद आणि त्याला पुन्हा हसवण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या हास्याने मैत्रीची उब वाढते आणि तो पुन्हा जवळचा वाटतो. संवादात्मकता जिव्हाळ्याची हाक, मित्राबद्दलची आत्मीयता आणि त्याच्या सोबत असण्याची ओढ अगदी नेमकेपणाने ह्या ओळींमध्ये उतरली आहे.
ही कविता केवळ मैत्रीवर आधारलेली नाही, तर ती जीवनातील संघर्ष, चढ-उतार, त्यातून शिकण्याची वृत्ती आणि निसर्गाशी मैत्री यांचाही सुंदर संगम आहे. कवयित्रीने निसर्गाचे रूपक अत्यंत प्रभावीपणे वापरून जीवनातील सत्य मांडले आहे. मैत्री हा जीवनाचा आधार आहे, आणि तिची आठवण काळजाला भिडते—ही कविता हेच सांगते.
आशयगर्भ आणि भावनाप्रधान शब्दरचना, निसर्गाच्या माध्यमातून मैत्रीचे चित्रण, कडव्यागणिक बदलणारा भावस्पर्शी आशय, सकारात्मकता आणि आत्मीयता यांचा उत्तम संगम ही ह्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत.
ही कविता वाचताना मैत्रीचा उबदार अनुभव मिळतो आणि वाचकाच्या मनात कुठेतरी स्वतःच्या मित्राच्या आठवणी उमटतात. यातला संवाद, प्रेम, आणि आपुलकी हीच या कवितेची खरी जादू आहे!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०३/२०२५ वेळ : ०४:१४
Post a Comment