प्रस्तावना:
कधी कधी शब्द नसतानाही भावना संवाद साधतात... डोळ्यांच्या कडांवर तरळणाऱ्या भावना, हलक्याशा थरथरणाऱ्या ओठांवरचा न बोलेला शब्द, श्वासांच्या लयीत हरवलेली कुजबुज – या साऱ्यात एक न बोललेला संवाद असतो. अशा हळव्या, न बोलल्या जाणाऱ्या भावनांच्या स्पंदनांची अनुभूती घेण्यासाठी सादर करत आहे माझी कविता...
तुला माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा...
तुला माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा,
हवा अचानक शांत होते,
सुस्काऱ्यांत दडलेले शब्द
हलकेच कानाशी कुजबुजतात,
आणि तुझ्या पापण्यांच्या कडांवर
अधीर भावना थरथरतात.
तुला माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा,
क्षितिजावर सावल्या दाटतात,
हळव्या वाऱ्याची कुशीत येणारी झुळूक
अवकाशात अडकलेल्या शब्दांना
टिपूर चांदण्यांसारखी उजळते.
तुझ्या ओठांवर थरथरणारा शब्द,
जणू कोवळ्या पानावरचा लाजरा दवबिंदू,
तू न बोललेलं वाक्य,
श्वासांच्या गहिऱ्या लयीत घुटमळत राहतं,
माझ्या डोळ्यांत शोधतं राहतं
त्या क्षणांचं मौनातलं गूढ व्याकरण.
तुला माझ्याशी बोलायचं असतं तेव्हा,
तू काहीही न बोलताही
साऱ्या भावना सांगून जातेस,
आणि मी ऐकत राहतो...
त्या न बोललेल्या शब्दांना,
जे स्पंदनासारखे हृदयावर उमटत राहतात.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/०३/२०२५ वेळ : ०८:०१
Post a Comment