आपली काही नैतिक आणि सामाजिक मूल्ये आहेत, पण ती विसरून आपण अशा गोष्टी स्वीकारतो / मान्य करतो ज्याला सामाजिक विरोध व्हायला हवा. सामाजिक जबाबदारी जागृत करणारी ही हृदयस्पर्शी कथा.
डॉ. गिरीश कालपासून खूप उदास होता. प्रभातफेरीसाठी तो बाहेर पडला, पण मन थार्यावर नव्हतं, त्याला काहीतरी सारखं बोचत होतं.
'डॉ. गिरीश...!' डॉ. विजयने मागून हाक मारली.
'अरे..., डॉ. विजय! तू कसा आहेस.' डॉ. गिरीशने विचारले.
'मी ठीक आहे... पण तू काल डॉ. विकास आणि मानवीच्या लग्नाला का आला नाहीस?' डॉ. विजयने विचारले.
'हो...ते...' डॉ. गिरीश काही बोलायच्या आधीच डॉ. विजय म्हणाला, 'तू आणि विकास खूप चांगले मित्र आहात. त्यामुळे काल तुझ्या अनुपस्थितीची मोठी चर्चा झाली. सगळे तुला विचारत होते. खूप मोठमोठे डॉक्टर सर्जन आले होते. तुला आठवतंय, एके काळी आपण तिघेही एकाच इमारतीत राहात होतो. किती घट्ट मैत्री होती आपली.
डॉ. गिरीश मात्र तंद्रीत चालत असल्यासारखा चालत होता. ते पाहून डॉ. विजय म्हणाला, 'डॉ. गिरीश, काय झालं, तू ठीक आहेस का? तुझी तब्येत आणि कुटुंबात सर्व काही ठीक आहे का?'
'हो, सगळं ठीक आहे. डॉ. विजय, आणि हो तुला हे सगळं आठवतंय हे ऐकून आनंद झाला. मीपण तुला एक आठवण करून देतो. तुला आठवतंय, त्या काळात माझी बायको लांब कन्सलटेशनसाठी जायची, तेव्हा विकासची बायको रिद्धिमा आमचं जेवण बनवायची. एकदा आम्ही दोघे रात्री उशिरा घरी पोहोचलो तेव्हा तिने पटकन आमच्यासाठी जेवण बनवलं. आणि आठवतंय डॉ. विजय, तुझी बायको आणि तू मेडिकल कॉनफरन्ससाठी बाहेरगावी असताना रिद्धिमाने तुमच्या मुलीला तीन दिवस सोबत ठेवलं होतं. रिद्धिमाने आपल्या दोन्ही कुटुंबांना किती वेळा मदत केली कुणास ठाऊक. दरम्यान तू जागा बदललीस. डॉ. विजय, तू खूप प्रॅक्टिकल माणूस आहेस. तू अनेक गोष्टी विसरला असशील, पण मी हृदयाचा डॉक्टर आहे, त्यामुळे कदाचित अनेक गोष्टी हृदयात राहातात. मी आणि माझ्या पत्नी क्रितीने, रिद्धिमाला विकाससाठी रडताना पाहिले आहे. तिने खूप विनवणी केली, तिच्या प्रेमाची आणि मुलांची शपथ घातली, पण विकासने तिचे ऐकले नाही. तुला माहित आहे, रिद्धिमान मला म्हणाली, भाऊ, मला त्यांच्या आणि मानवीच्या नात्याची काहीच अडचण नाही, मी ते मान्य करेन. फक्त मला आणि मुलांना या घरात राहू द्या. पण तिच्या एकाही शब्दाचा विकासावर परिणाम झाला नाही. रिद्धिमाला ते घर सोडावे लागलं. डॉ. विजय, माझा विश्वास आहे की, प्रेम कोणाशीही कधीही होऊ शकतं, परंतु एखाद्याची काही नैतिक जबाबदारी देखील असते. त्यामुळे मला डॉ. विकासबद्दल आदर नाही, तेव्हा मी त्याच्या लग्नाला जाऊन काय करणार? मला माझी बहीण रिद्धिमा आणि तिची मुलं जास्त जवळची वाटतात. त्यांना थोडासा आनंद देण्याचा माझा आणि क्रितीचा प्रत्येक संभाव्य प्रयत्न असतो. तू ते सर्व विसरलास आणि तुला फक्त डॉ. विकासपासून तुझे काय फायदे झाले तेच आठवतात. केवळ तूच नाही तर त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेले प्रत्येकजण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल आणि आपुलकीबद्दल मोठमोठया बाता मारतात, ते सर्व रिद्धिमाची आणि तिच्या मुलांची दुःख कशी काय विसरू शकता? अशा तथाकथित मोठ्या लोकांमुळे माझी चिडचिड होते, पण माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने मला काहीही विसरु दिले नाही. मी रिद्धिमासोबत आहे. असे म्हणत डॉ. गिरीशने चालण्याचा वेग वाढवला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते, पण आता मनात शांतता होती.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०५/२०२४ वेळ : १०३०
Post a Comment