अर्थसंकल्पा मागचं सामान्यज्ञान

 

 

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तो संसदेमध्ये मांडतील. सलग सहाव्यांदा त्या देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी निवडणुकीचे वर्ष असल्याने त्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेत सादर केलेल्या वार्षिक आर्थिक विवरणास केंद्रीय अर्थसंकल्प म्हणतात, जो विकासावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे. सामान्य अर्थसंकल्प किंवा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकार उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देते. अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून देश सुधारणे आणि लोकांना चांगले जीवन जगण्यास मदत करणे हा आहे. सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आर्थिक धोरणे राबवते आणि दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश दुर्मिळ संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणे हा असतो. हा दस्तऐवज आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजे उत्पन्न आणि खर्चाच्या तपशीलवार नोंदी देतो. अर्थसंकल्पात समाविष्ट केलेले प्रस्ताव संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर १ एप्रिलपासून लागू होतात, जे पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत लागू राहतात. अर्थसंकल्प हा भविष्यातील योजना आणि उद्दिष्टांवर आधारित विशिष्ट कालावधीसाठी पूर्वनिर्धारित महसूल आणि खर्चाचा अंदाज आहे, जो भविष्यातील आर्थिक परिस्थिती प्रतिबिंबित करतो आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करतो. हा एक दस्तऐवज आहे जो व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी त्याच्या उद्दिष्टांवर आधारित आगामी कालावधीसाठी महसूल आणि खर्चाचा अंदाज घेण्यासाठी तयार केला जातो. भारतीय संविधानाच्या कलम ११२ नुसार, एका वर्षासाठीचे केंद्रीय अर्थसंकल्प, ज्याला वार्षिक आर्थिक विवरण देखील म्हटले जाते, हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्गीकरण महसूल बजेट आणि भांडवली बजेटमध्ये करता येते. अर्थसंकल्प तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्थ मंत्रालयावर आहे. अर्थसंकल्पात सरकारी तिजोरीतून काय बाहेर पडते हे १ फेब्रुवारीला कळेल, परंतु जो अर्थसंकल्प अवघ्या काही तासांमध्ये सादर केला जातो त्याच्या पूर्वतयारीकरिता साधारण पाच महिन्यांचा कालावधी लागतो. या तयारीदरम्यान, वित्त मंत्रालय केंद्र सरकारच्या इतर मंत्रालयांच्या आणि विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेते, ज्याच्या आधारे आर्थिक वर्षासाठी कोणत्या मंत्रालयाला किती रक्कम द्यायची हे ठरवले जाते. या बैठकांमध्ये निर्णय घेतल्यानंतर ब्लू प्रिंट तयार करण्यात येते. अर्थसंकल्पाचा मसुदा तयार झाल्यानंतर, अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कॅबिनेट सदस्यांसह एका बैठकीत अर्थसंकल्पाचा आढावा घेतात आणि वित्त आणि महसूल संबंधित धोरणे ठरवतात. संपूर्ण मंत्रिमंडळाने मंजूर केल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो. अंदाजपत्रक साधारणपणे तीन प्रकारचे असते, संतुलित अर्थसंकल्प, अतिरिक्त बजेट आणि तुटीचे बजेट. संतुलित अर्थसंकल्पात उत्पन्न आणि खर्चाची रक्कम समान असणे आवश्यक आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा जास्त असते आणि तुटीच्या बजेटमध्ये सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त असतो. सरकारी बजेटचे तीन प्रकार आहेत, ऑपरेटिंग किंवा चालू बजेट, भांडवल किंवा गुंतवणूक बजेट आणि रोख किंवा रोख प्रवाह बजेट.

अर्थसंकल्पाशी निगडीत काही रंजक पैलूंकडे पाहणे देखील मनोरंजक आहे. यापूर्वी अर्थसंकल्पाच्या काही प्रती छापल्या जात होत्या मात्र आता अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल झाला आहे. २०१६ पर्यंत सामान्य अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता, परंतु २०१७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस बदलून १ फेब्रुवारी केला. १९९९ पर्यंत, अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सादर केले जात होते, परंतु १९९९ मध्ये यशवंत सिन्हा यांनी ते बदलून सकाळी ११ वाजता केले. २०१७ पूर्वी, रेल्वे अर्थसंकल्प देखील स्वतंत्रपणे सादर केला जात होता, परंतु २०१७ मध्ये, तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला. १९५५ पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीतच मांडला जात होता, पण त्यानंतर तो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये मांडला जाऊ लागला. १९५० पर्यंत हे बजेट राष्ट्रपती भवनात छापले जात होते, पण ते लीक झाल्यानंतर ते दिल्लीतील मिंटो रोड येथील प्रेसमध्ये छापले जाऊ लागले आणि १९८० पासून ते अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सरकारी प्रेसमध्ये छापले जाते. १९४७ पासून देशात ७५ सामान्य अर्थसंकल्प, १४ अंतरिम अर्थसंकल्प आणि ४ विशेष किंवा लघु बजेट सादर करण्यात आले आहेत. तथापि, भारतात अर्थसंकल्प सादर करण्याची प्रक्रिया १६४ वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा ७ एप्रिल १८६० रोजी, जेम्स विल्सन, ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित असलेले स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री यांनी प्रथमच भारताचा अर्थसंकल्प ब्रिटिश सम्राज्ञी समोर सादर केला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुगम चेट्टी यांनी सादर केला होता, ज्यामध्ये कोणताही कर न लावता केवळ अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. भारतीय प्रजासत्ताक स्थापनेनंतरचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी २८ फेब्रुवारी १९५० रोजी सादर केला होता. अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प मांडत असले तरी पंतप्रधानांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याचे तीन प्रसंग आले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे भारताचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी वित्त विभागाचा ताबा घेतला आणि १३ फेब्रुवारी १९५८ रोजी अर्थसंकल्प सादर केला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. केसी नियोगी हे भारताचे एकमेव असे अर्थमंत्री होते जे त्यांच्या कार्यकाळात एकही अर्थसंकल्प मांडू शकले नाहीत. १९४८ मध्ये ते केवळ ३५ दिवस अर्थमंत्री होते.

अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९५९-६९ दरम्यान १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी १९९६-९८ या काळात आणि त्यानंतर यूपीए-१ आणि यूपीए-२ सरकारमध्ये एकूण ९ वेळा, १९८२-८४ या काळात इंदिरा सरकारमध्ये आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये २००९-१२ मध्ये संयुक्त आघाडी सरकारमध्ये एकूण ८ वेळा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हे काम केले. यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख आणि यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ७ वेळा, मनमोहन सिंग आणि टीटी कृष्णमाचारी यांनी प्रत्येकी ६ वेळा अर्थसंकल्प सादर केला. इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. फक्त ८०० शब्दांचे सर्वात छोटे भाषण १९७७ मध्ये अर्थमंत्री हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी दिले होते, १८६५० शब्दांचे सर्वात मोठे बजेट भाषण मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये दिले होते. त्यानंतर २०१८ मध्ये अरुण जेटली यांनी १८६०४ शब्दांचे बजेट भाषण दिले. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे. त्यांनी २ तास ४२ मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते. 

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक ; ३०/०१/२०२४ वेळ २३०४

Post a Comment

Previous Post Next Post