नैतिक अधःपतनाचा नवा अध्याय

 

सत्तेसाठी सर्व प्रकारच्या योग्य-अयोग्य युतींपासून फारकत घेणे ही भारतीय राजकारणात नवीन गोष्ट नसली तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी ज्या प्रकारे पुन्हा एकदा स्वतःचे सरकार पाडले आणि नवीन सरकार स्थापन केले, ते पाहता ते नैतिक अधःपतनाचे नवीन मानक म्हणून नक्कीच लक्षात राहातील. २०१७ मध्ये जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या सोबत सुमारे १७ महिने चालविलेले सरकार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने मोडले. नितीश यांच्या खात्यात अशा अनेक अनैतिक राजकीय कथा आहेत, पण त्यांनी यावेळी ज्याप्रकारे सहकार्‍यांना वागणूक दिली, ते त्यांच्या नैतिक अधःपतनाचे पूर्णपणे नवे उदाहरण म्हणावे लागेल.


नितीश कुमार १९९४ मध्ये जनता दलापासून वेगळे झाले. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत समता पक्षाची स्थापना केली आणि १९९६ मध्ये भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यांनी २००३ मध्ये जेडीयुची स्थापना केली आणि २००५ मध्ये भाजप सोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केले होते. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे नाराज होऊन ते वेगळे झाले. २०१४ मध्ये त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवत फक्त २ जागा मिळवल्या होत्या. हे लक्षात घ्या की, २००९ मध्ये त्यांच्याकडे १८ जागा होत्या. २०१४ मध्ये पराभवाची जबाबदारी स्वीकारून नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी जितनराम मांझी यांच्याकडे गादी सोपवली. बहुमत चाचणीदरम्यान लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे विधानसभा सरकार वाचवले त्यामुळे तिन्ही पक्षांच्या महाआघाडीचा मार्ग मोकळा झाला. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीतही यश मिळाले. २०१७ मध्ये नितीश यांनी पुन्हा सरकार पाडले. भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. युतीकडे बहुमत होते. भाजपच्या दोन उपमुख्यमंत्री सूत्र आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मुद्द्यावर असंतोष व्यक्त करत त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भाजप पासून वेगळं होत पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन केले आणि तेच मुख्यमंत्री राहिले. आज रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सायंकाळपर्यंत भाजपाची मदत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले.


आपल्या अशा कृतीतून नितीश यांनी अनैतिक आचरणाचा आदर्श घालून दिला आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे. यात भाजपही तितकीच जबाबदार आहे. ते १७ महिने दोघांनीही एकमेकांना शिव्याशाप देण्याची एकही संधी सोडली नव्हती. नितीश कुमार २०१७ मध्ये युती तोडताना म्हणाले होते की 'भाजपसोबत जाणे ही त्यांची मोठी चूक होती. यापुढे जीव गेला तरीही भाजपसोबत जाणार नाही.' दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणूक प्रचारसभेत आव्हान देत म्हणाले होते की, 'नितीश आणि लल्लनप्रसाद सिंह (माजी जेडीयू अध्यक्ष आणि खासदार) यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.' नुकतंच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. गेल्या काही दिवसांपासून नितीश पुन्हा पलटी मारणार अशी चर्चा होती. ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना भेटायला गेले होते तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली होती. त्या बैठकीचे वर्णन राजशिष्टाचार म्हणून केले गेले होते. तरीदेखील शनिवार पर्यंत जेडीयूचे अनेक ज्येष्ठ नेते युती अबाधित आहे, असे सांगत होते. या विधानांनंतर २४ तासांत नितीशकुमार नवव्यांदा शपथ घेऊन मुख्यमंत्री बनले. राजकारणांच्या जिभेवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार जनतेला करायला भाग पाडले आहे. भारतीय राजकारणाची विश्वासार्हता किती आणि कशी धोक्यात आली आहे हे नितीश कुमार यांनी उदाहरणासह स्पष्ट केले आहे.

यावेळी नितीश यांचं आचरण एका खुर्चीसाठी किंवा एका राज्यापुरता मर्यादित नाही. भारतीय लोकशाहीचा हा सर्वात मोठा विश्वासघात आहे आणि तोही तेव्हा जेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मोदी आणि भाजप यांच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षांकडून अतिशय कठीण आव्हान निर्माण केलं जात आहे, ज्याचा नितीश एक महत्त्वाचा भाग होते. याच मृत अवस्थेत पोहोचलेल्या संयुक्त विरोधी आघाडीचे नितीश प्रमुख होते. सुमारे एक वर्षभरापूर्वी त्यांनी याबाबत चर्चा सुरू केली आणि आज 'इंडिया' या नावाने महाआघाडी निर्माण झाली आहे. नितीश यांच्या पुढाकाराने त्याची पहिली बैठक बिहारमध्ये राजधानी पाटणा येथे झाली होती. या आघाडीवर काँग्रेसच्या वर्चस्वाची स्वीकृती निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. ते असेही सांगत राहिले की, इंडिया आघाडीमध्ये समन्वयक किंवा पंतप्रधान पदासाठी कोणताही संघर्ष नाही. ते महाआघाडीचे प्रमुख शिल्पकार होते. त्यांच्या विधानांचा प्रभाव मित्रपक्षांवर पडला आणि भाजपला पर्याय म्हणून आघाडीकडे पाहताना लोकांमध्ये उत्साह संचारला होता. तज्ज्ञ सांगत आहेत की, नितीश आणि भाजपच्या आजच्या आचरणामुळे राज्यातील जनतेच्या मनामधील त्यांच्या प्रतिमांमध्ये मोठी घसरण होईल आणि अर्थात ह्या फेररचनेचा काँग्रेस आणि राजदला फायदा होईल. लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षांना आणि डाव्या पक्षांना जागा वाटपात जास्त जागा मिळू शकतील. बरं, ही नंतरची गोष्ट आहे, परंतु, नितीश यांनी आपले पूर्वीचे सर्व कलंक धुवून काढण्याची एक अनोखी संधी निश्चितच गमावली आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : २८/०१/२०२४ वेळ २३०४

Post a Comment

Previous Post Next Post