लघुकथा - चूक


लघुकथा
सुवर्णक्षण 
१२.९.२०२३

चूक

दोघेही अजून जवळ आले नव्हते पण हळूहळू एकमेकांचे आकर्षण वाढत होते. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर अमित कोणत्या ना कोणत्या बहाण्याने अस्मिताला भेटायचा. कितीतरी वेळा अस्मिताही गेटबाहेर त्याची वाट पाहत असायची. असेच एक वर्ष निघून गेले. आज अस्मिताकडे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या, असं ठरवून अमित घरून निघाला. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर दोघे भेटले. अमित अस्मिताला म्हणाला, 'आज मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे." 

"हो, बोल ना." अस्मिता रोमांचित झाली. जणूकाही ती अमितच्या पुढाकाराचीच वाट पाहत होती असे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. दोघेही नेहमीच्या उद्यानात नेहमीच्या बाकावर बसले. काही वेळ नि:शब्द गेल्यानंतर अस्मिताच बोलली, "अमित, अरे बोल ना. तुला मला काहीतरी सांगायचे होते ना?" अमित नजरेला नजर न मिळवताच तोंडातल्या तोंडात पुटपुटला, "आय . . . . लव. . . . यू. . . ." हे बोलून तो स्तब्ध होत होता. तितक्यात अस्मिताला हसू फुटलं आणि हसू आवरत ती अमितला म्हणाली, "अरे! तू माझी समस्या सोडवलीस." इतकं बोलून ती पुन्हा जोरात हसू लागली. अमित तिचा हात हातात घेऊन म्हणाला - 'मला एक संधी दे. आपण लग्न करु. मी आयुष्यभर तुझ्या डोळ्यांनी हे जग पाहीन." तो तिला मिठीत घेण्यासाठी पुढे जाऊ लागला. तसं त्याला मागे ढकलत अस्मिता म्हणाली, "अमित, मी सुद्धा तुझ्य‍ाकडे आकर्षित झाले होते, पण आता मी तुझ्यावर प्रेम करण्याचा विचार सोडून दिला आहे. तू माझ्यावर प्रेम करतो हेदेखील तुला स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने माझ्याशी बोलता येत नाही. त्यावर कहर म्हणजे हे सुंदर जग तुला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. आपण हे जग आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि मला माझ्या डोळ्यांनी जग पाहणारा जीवनसाथी कधीच आवडणार नाही. हे जग विसंगतींनी भरलेले आहे. ते आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा जगण्याचा मार्ग आहे. तू हे बोलून माझा प्रश्नच सोडवला आहेस. चल मी निघते. गुड बाय!" असं म्हणत अस्मिता गेली.  

तिला दूर जाताना पाहून अमितला आश्चर्य वाटलं. त्याला काही समजत नव्हतं, त्याचं कुठे चुकलं? 
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
 मुंबई, महाराष्ट्र 
दिनांक : १०/०९/२०२३ वेळ : ६:१०

Post a Comment

Previous Post Next Post