कविता - सुखाचे सोनेरी क्षण


स्पर्धेसाठी
त्रैमासिक साहित्य प्रवाह द्वारा आयोजित
कवी विशाल कन्हेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यलेखन स्पर्धा
दि.७/११/२६
विषय: क्षण नवे सुखाचे

शीर्षक: सुखाचे सोनेरी क्षण

पहाटेच्या कोवळ्या उन्हात,
स्वप्नांना नवी पालवी फुटते;
कालच्या दुःखाच्या धुक्यातून,
आशेची चाहूल अलगद लागते...

ओंजळीत मायेची ऊब,
डोळ्यांत उद्याचे चांदणे;
आपुलकीच्या दोन शब्दांनी,
आनंदाने फुलते जगणे...

ओठांवर हसू फुलले तरी,
मनात कधी काहूर माजते;
काळोखाच्या कठीण वाटेवर,
जिद्दीची दीपमाळ उजळते...

मायेच्या हळुवार स्पर्शाने,
अबोल भावनाही विरघळतात;
दुसऱ्याच्या हास्यामध्ये,
स्वतःचेही आभाळ शोधतात...

नसते गरज सुख मोजण्याची,
स्वर्ग शोधण्याची हौसही सरते;
माणुसकीच्या सहवासात,
क्षण नवे सुखाचे जीवन जगते!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०७/११/२०२६ वेळ: २२:२३

Post a Comment

Previous Post Next Post