कविता – “निःशब्द जखम”


वेलवेट कविशा पब्लिकेशन
आयोजित एक "अनोखी काव्यलेखन स्पर्धा"

कालावधी - २५ एप्रिल ते २५ मे २०२६ 
निकालाची तारीख - १० जून २०२६ 

विषय - मनातल्या कविता

शीर्षक: “निःशब्द जखम”

मी 
स्वतःपासून 
दूर झालेला माणूस…

लोक स्वतःला सावरतात,
मी मात्र
स्वतःलाच मोकळं सोडत गेलो…

हातात होत्या
स्वप्नांच्या ठिणग्या,
आणि नकळत
त्या राखेत बदलत गेल्या—
माझ्याच उष्णतेने…

मनात होतं 
एक शांत आकाश,
पण आतल्या हवेत
ओल वाढत गेली,
आणि ढग
न सांगता रडू लागले…

जपता आलं असतं
तर उभा राहिलो असतो,
पण तुटण्यातही
एक विचित्र ओढ असते—
तीच मला खेचत राहिली…

आश्चर्य एवढंच—
सगळं विखुरत असताना
मी आवाज हरवला नाही,
मी तो वापरलाच नाही…

ना आक्रोश,
ना आरोप,
फक्त अस्तित्व
हळूहळू विरघळत गेलं
स्वतःच्या सावलीत…

आणि तरीही—
मनाच्या तळाशी
एकही तरंग नाही,
एकही ठसा नाही…

कदाचित
हीच सवय झाली,
किंवा
हीच शिक्षा—
जाणवत राहणं
पण काहीच न वाटणं…

स्वतःला जाळूनही
उब न मिळणं—
आणि शेवटी
थंडीशीही
काही न बोलणं…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक: २६/०४/२०२६ वेळ: ११:१६

Post a Comment

Previous Post Next Post