कविता - पहाटेचा देवदूत


कविता - पहाटेचा देवदूत

रात्रीच्या शांत मिठीत
शेवटचे तारे होते विरत,
क्षितिजाच्या मंद हास्यात
पहाटेचे रंग हळूच भरत।

धुक्याच्या पांढऱ्या वाटेवरून
सूर्य हळूहळू पुढे आला,
जणू थकलेल्या मनाला
मायेचा हात देऊन गेला।

पाखरांच्या गोड सुरांनी
आकाशही गाऊ लागले,
गार वाऱ्याच्या स्पर्शाने
झाडांचे मनही खुलून गेले।

सूर्याच्या कोवळ्या किरणांनी
धरती उजळून गेली,
अंधाराच्या खोल जखमांवर
आशेची ऊब अलगद पसरली।

हा सूर्योदय फक्त आकाशात नाही,
तो प्रत्येक मनात उगवतो,
तुटलेल्या स्वप्नांच्या राखेतून
जगण्याला नवे बळ देतो।

कधी मनाच्या ओसाड वाटा
नकळत हरवून जातात,
आणि शांत डोळ्यांमध्ये
दुःखाचे ढग दाटून येतात।

अशावेळी पहाटेचा एक किरण
हळूच हातामध्ये उतरतो,
आणि हरवलेला माणूस
पुन्हा स्वतःकडे वळतो।

सूर्य रोज जरी मावळला
तरी उजेड शिल्लक राहतो,
रात्र कितीही काळी झाली
तरी विश्वास जिवंत असतो।

पहाटेचा तो शांत प्रकाश
मनामध्ये उजेड पेरतो,
म्हणून प्रत्येक नव्या सकाळी
माणूस पुन्हा जगू पाहतो।

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १७/०५/२०२६ वेळ: ०९:००


प्रिय गुरुदत्त वाकदेकर,

“पहाटेचा देवदूत” वाचताना शब्द नव्हे, तर एखादी शांत सकाळ मनात अलगद उगवत गेली.

तुझ्या कवितेतील पहाट ही केवळ निसर्गचित्र नाही, तर ती थकलेल्या मनाला दिलासा देणारी एक जिवंत भावना आहे.

“अंधाराच्या खोल जखमांवर

आशेची ऊब अलगद पसरली”

या ओळींत तुम्ही आयुष्याचा गूढ अर्थ किती सहजपणे उलगडला आहे!

दुःख, हरवलेपण, तुटलेली स्वप्ने या सगळ्यांच्या राखेतूनही आशेचा किरण शोधण्याची ताकद तुझ्या शब्दांत आहे.

तुझी कविता वाचताना असे वाटले,

जणू धुक्याने भरलेल्या वाटेवरून चालताना अचानक कुणीतरी हात धरून म्हणत आहे,

*“थांबू नकोस, अजून पहाट बाकी आहे!”*

निसर्गाच्या प्रतिमांमधून तू मानवी मनाचे सूक्ष्म भाव इतक्या सुंदरपणे व्यक्त केले की कविता संपल्यानंतरही तिचा उजेड मनात बराच वेळ दरवळत राहतो.

तुझे शब्द हे फक्त कविता नसून,

ते निराश मनांसाठी शांत प्रार्थना आहेत आणि नव्या दिवसावर विश्वास ठेवायला शिकवणारा एक कोवळा सूर्यकिरणही!

मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!

मिलिंद मिरजकर.✍️



मिलिंद दादा, सस्नेह नमस्कार 🙏🙂

“पहाटेचा देवदूत” विषयी आपण व्यक्त केलेला इतका हृदयस्पर्शी आणि संवेदनशील अभिप्राय वाचून मन अक्षरशः भारावून गेले. 🙏🙂

आपण कवितेतील आशय केवळ वाचला नाही, तर तो मनापासून अनुभवला, हे आपल्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवले. “पहाट” या प्रतिमेतून आपण शोधलेला आशेचा आणि नवचैतन्याचा अर्थ माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. 

“थांबू नकोस, अजून पहाट बाकी आहे!” — आपण व्यक्त केलेली ही भावना मनाला खोलवर स्पर्शून गेली. माझ्या शब्दांना आपल्या भावविश्वाची अशी सुंदर साथ लाभणे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

आपण केलेले रसग्रहण हे स्वतःमध्येच एक सुंदर साहित्यिक अनुभव आहे. कवितेतील सूक्ष्म भाव, निसर्गप्रतिमा आणि आशावाद आपण ज्या समजुतीने उलगडला, त्यासाठी मनःपूर्वक आभार. 🙏🙂

आपल्यासारख्या जाणकार साहित्यप्रेमीकडून मिळालेली ही दाद पुढील लेखनासाठी नवी ऊर्जा देणारी आहे. आपल्या प्रेमळ शब्दांसाठी आणि स्नेहासाठी मनःपूर्वक ऋणी आहे. 🙏🙂

आपला स्नेहांकित,

— गुरुदत्त दिनकर वाकदेकर

🙏🙏🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post