कविता - उजेडाच्या पडद्यामागचा अंधार


कविता - उजेडाच्या पडद्यामागचा अंधार

हातातल्या छोट्याशा पडद्याने
जग मुठीत आणलं,
पण मनाच्या ओंजळीतलं
समाधान
नकळत निसटून गेलं.

क्षणात चित्र टिपलं,
क्षणात रंग खुलवले,
हास्यालाही फिल्टर चढवून
आनंदाचा मुखवटा
चेहऱ्यावर ठेवला.

वेगाने धावणाऱ्या बोटांना
सगळं सहज वाटलं,
पण विचारांच्या पावलांना
चालण्याचा विसर पडला.

स्वतःच्या श्रमांवर उभा असलेला
माणूस
हळूहळू
यंत्रवत झाला.

स्वावलंबनाची मुळे
अलगद सैल होत गेली,
आणि परावलंबनाची वेल
जीवनाभोवती
घट्ट विळखा घालू लागली.

भस्मासुराच्या स्पर्शासारखं
हे तंत्रज्ञान
सुविधांच्या नावाखाली
क्षण, नाती, शांतता,
आणि एकांतही
गिळू लागलं.

आपल्याला वाटलं
आपण वेळ जिंकतोय,
पण खरं तर
वेळच आपल्याला
हळूहळू गिळत गेला.

आज कामं झपाट्यानं होतात,
चित्रं उजळून निघतात,
पण मनाच्या आरशावरचे
धूसर प्रश्न
तसेच रेंगाळतात.

म्हणूनच
उजेडाच्या या पडद्यामागे
एक खोल अंधार दडलेला आहे—
जिथे माणूस
सगळं मिळवूनही
स्वतःलाच हरवून बसतो.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०९/०४/२०२६ वेळ: ०७:११

Post a Comment

Previous Post Next Post