कविता - मंतरलेले दिवस


शब्दवेध साहित्य मंच, पुणे

आयोजित

काव्य स्पर्धा

कालावधी: १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२६

विषय: "रम्य ते बालपण"

काव्यप्रकार: मुक्तछंद

शीर्षक: मंतरलेले दिवस

आठवणींच्या आकाशात
आजही उडतं ते बालपण,
चिमुकल्या पाखराच्या पंखांवर
निरागसतेचं निळं आकाश घेऊन.

अनवाणी पायांनी
मातीच्या कुशीत उमटवलेली
ती पहिली पावलं,
आजही मनात
ओलसर सुगंधासारखी दरवळतात.

पावसाच्या पहिल्या सरीत
आभाळ आमच्यासाठी झुकायचं,
आणि कागदी होड्यांत बसलेली स्वप्नं
ओढ्याच्या पाण्यावरून
क्षितिजाशी मैत्री करायला निघायची.

शाळेची वाट म्हणजे
अक्षरांचा उत्सव,
मित्रांच्या हसण्यात दडलेली
जगण्याची पहिली कविता,
आणि दप्तरात पुस्तकांबरोबर
मोरपीसासारखे मंतरलेले दिवस.

आईची हाक
संध्याकाळच्या वाऱ्यावर तरंगणारी
मायेचा घंटानाद होता,
तर बाबांच्या खांद्यावरून
दिसणारं जग
विश्वापेक्षाही विशाल भासत असे.

आजीच्या गोष्टींतून
रात्र चांदण्यांनी उजळायची,
राजा, राण्या, पर्‍या,
राक्षस आणि देव
डोळ्यांत उतरून
निद्रेची आराधना करायचे.

आंब्याच्या झाडाखाली
दुपार निजलेली असायची,
आणि आम्ही सावलीत बसून
ढगांवर रंगवायचो
हत्ती, ससे आणि किल्ले.

लगोरीच्या दगडांत
उभारायचो धैर्याचे मनोरे,
लपंडावात शोधायचो
हरवलेला आनंद,
आणि गोट्यांच्या वर्तुळात
जिंकण्याइतकंच
हरण्याचं सौंदर्य शिकायचो.

रुसवे-फुगवे
दवबिंदूंइतके हलके,
एका हसण्यात विरघळणारे,
कारण मनात तेव्हा
अहंकाराचा अंधार नव्हता,
फक्त निरागसतेचा
लख्ख उजेड होता.

आज आयुष्याच्या
गर्दीच्या वाळवंटात
श्वास कोरडा पडतो तेव्हा,
हेच बालपण
थंड झऱ्यासारखं
मनाला झुळूक देऊन जातं.

जुन्या वहीतल्या
मोरपिसाच्या आठवणी
हळूच डोळ्यांत उतरतात,
आणि नकळत
ओठांवर एक निष्पाप हसू
फुलून जातं.

तेव्हा जाणवतं—
बालपण हा
फक्त मागं राहिलेला काळ नाही,
तो मनाच्या मंदिरात
सदैव तेवत राहिलेला
निर्मळतेचा दिवा आहे.

तो दिवा
दुःखाच्या रात्रीत
आशेचा उजेड देतो,
जगण्याच्या वादळात
मनाला आधार देतो,
आणि माणसातलं मूल
कधीच मरू देत नाही.

म्हणूनच
रम्य ते बालपण
कधी हरवत नाही,
ते आठवणींच्या आकाशात
चिमुकल्या पाखरासारखं
सदैव उडत राहतं.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १२/०४/२०२६ वेळ: ०९:५४

Post a Comment

Previous Post Next Post