कविता - घामाचा मान
घाम
मानाने गळू दे,
तो पराभवाचा नव्हे,
प्रामाणिक श्रमांचा हार असतो.
कपाळावरून ओघळणारा
प्रत्येक थेंब
मातीत मिसळताना
उद्याचं सोनं पिकवत असतो.
तळहातांच्या रेषांमध्ये
नशिबापेक्षा जास्त
कष्टांची अक्षरं असतात,
जी आयुष्याला अर्थ देतात.
घामाचा सुगंध
मोगऱ्याहूनही पवित्र,
कारण त्यात मिसळलेले असते
स्वप्नांच्या ध्यासाचे निःशब्द तेज.
ज्यांच्या हातांनी
दगडालाही देवत्व दिलं,
त्यांच्या श्रमांना
काळही वंदन करतो.
घाम गळताना
मन कधी थकू नये,
कारण त्याच थेंबांतून
स्वाभिमानाचे अंकुर फुटतात.
भाकरीच्या प्रत्येक तुकड्यामागे
एखादा घामाचा मोती असतो,
आणि त्या मोत्याची चमक
जीवनाला प्रतिष्ठा देते.
म्हणून
घाम मानाने गळू दे,
तोच माणसाच्या जगण्याला
खरा गौरव देतो.
मातीचं नातं
माणसाला उंचावतं,
अन् श्रमाच्या वाटेवर
जीवन उजळतं.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०३/२०२६ वेळ :२०:५२
Post a Comment