कविता - आनंदाचा खरा मार्ग
जीवन त्याचंच प्रसन्न,
जो ध्येयवाटेने निष्ठेने चालतो.
हातांना श्रमांचा सुगंध,
नयनांत उद्याची स्वप्नफुलं.
ओठांवर तक्रारींची छाया नाही,
आणि अंतरी शांत स्पंदन.
स्वकर्मात रमणं
हीच मनःशांतीची प्रार्थना,
कर्तव्याशी जुळलेली मैत्री
हीच जीवनाची साधना.
परसुख पाहताना
मत्सरकाटे उगवले,
की स्वानंदाची बहरलेली बाग
नकळत कोमेजून जाते.
मत्सर कधीच परक्याला नाही,
तो आधी स्वतःलाच जाळतो,
अंतरातील निर्मळ झरे
हळुवार आटवत जातो.
म्हणून आपल्या वाटेवर
हसत फुलत राहावं,
परयशाच्या क्षणातही
मनापासून हसू द्यावं.
खरा सुखी तोच,
जो स्वतःमध्ये विश्व पाहतो,
खरा समृद्ध तोच,
जो इतरांच्या यशात
आपलं सुख शोधतो.
जीवन उजळण्यासाठी
वैभवाची गरज नसते,
स्वच्छ मन, प्रामाणिक कर्म,
यातच समृद्धी वसते.
अशी साधी शिकवण
मनावर एकदा कोरली,
की प्रत्येक दिवस
उजेडाचा उत्सव ठरतो.
आणि....
स्वतःला जिंकणाऱ्यालाच
जग जिंकण्याचा खरा आनंद लाभतो.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३०/०३/२०२६ वेळ : ०५:३१
Post a Comment