कविता – हवाय फक्त एक खरा माणूस


कविता – हवाय फक्त एक खरा माणूस 

या झगमगत्या जगात
मला गर्दी नको,
नावांची आरास नको,
हवाय फक्त एक खरा माणूस.

जो हसताना मुखवटे चढवत नाही,
आणि रडताना अश्रू लपवत नाही,
जो शब्दांपेक्षा
हृदयाचे ठोके ऐकतो,
ज्याच्या असण्याने
मौनालाही अर्थ मिळतो.

जो यशाच्या शिखरावर उभा राहूनही
डोक्यात हवा जावू देत नाही,
तर अपयशाच्या अंधारात
हात पुढे करतो,
आणि दिवा बनतो.

जो स्वतःशी प्रामाणिक असल्याने
जगाशी पारदर्शक राहतो.
जिथे नात्यांना 
किंमतीचे बिल्ले लागत असताना,
तो विश्वासाने व्यवहार करतो,
निस्वार्थपणे,
निःशब्दपणे,
निखळ समर्पणाने.

ज्याच्याजवळ संपत्ती नाही,
तरी तो समाधानाचा सम्राट असतो,
आणि ज्याच्याजवळ अहंकार नाही,
तोच खरा श्रीमंत असतो.

जो अन्याय पाहून गप्प बसत नाही,
आणि संघर्षात
कोणालाही एकटे सोडत नाही,
जो चालतो सत्याच्या वाटेवर,
काट्यांतूनही
माणुसकी जपत.

ज्याच्या स्पर्शात दिलासा,
शब्दांत धीर,
आणि नजरेत
निखळ आपुलकी असते,
म्हणूनच अपरिचितही
आपलेसे होतात.

मला देव नको,
मला दैवत नको,
मला अवतार नको,
हवाय फक्त एक खरा माणूस.

जो माझ्या शांततेचा साक्षीदार होईल,
आणि वेदनांचा संरक्षक बनेल,
जो मला बदलणार नाही,
पण मला
मीच राहू देईल.

कारण
जग बदलायला
शस्त्रांची गरज नसते,
फक्त एका खर्‍या माणसाचे
हृदय पुरेसे असते.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक :२७/०२/२०२६ वेळ :०२:३४

Post a Comment

Previous Post Next Post