कविता – सेवेचे ठायी तत्पर
सेवेचे ठायी तत्पर
असणं म्हणजे
स्वतःच्या सावलीतून बाहेर पडून
इतरांच्या उन्हात उभं राहणं.
जिथे नावफलक नसतात,
तिथे हातांवरील फोड
खऱ्या योगदानाची साक्ष देतात.
कोणीतरी अंधःकारात
दिवा होऊन पेटतो,
आणि उजेडाचं श्रेय
कधीच स्वतःकडे खेचत नाही.
थकलेल्या श्वासांसाठी
पाणी बनून वाहणं,
हेच माणुसकीचं
सर्वात शुद्ध रूप असतं.
सेवा घोषणा मागत नाही,
ती कृतीतून उमलणारी
निशब्द प्रार्थना असते.
जिथे अपेक्षा गळून पडतात,
तिथे कर्तव्याला पंख फुटतात,
आणि त्या उड्डाणातूनच
समाजाचं आभाळ
थोडं अधिक स्वच्छ होत जातं.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :०६/०२/२०२६ वेळ :१०:४४
Post a Comment