कविता – दाता तू गणपती
माघीच्या पवित्र पहाटे
तमाची सावली विरते हळुवार,
अंतर्मनी जागते चेतना
श्रद्धेचा उजेड होतो साकार.
विघ्नांच्या गर्द प्रवाहात
सौम्य मुद्रा स्थैर्याची,
निःशब्दातून फुललेली
सूक्ष्म जाणीव अंतरीची.
देव्हाऱ्यापुरता मर्यादित
असा तू कधीच नसतोस,
विचारांच्या उगमाशी
तूच प्रथम अवतरतोस.
दिशा दाखवणारा प्रकाश
गोंधळलेल्या प्रश्नांवर,
विवेकाचा उन्नत दीप
अढळ, निर्णायक अंधारावर.
अहंभाव गळून जावा
म्हणून वक्र तुझे अंग,
ज्ञानापुढे मस्तक झुकावे
विलक्षण तुझा संग.
डगमगणारी पावले वळली
साधनेच्या खडतर वाटेवर,
हात धरून सावराया
निःसंदेह उभा वेशीवर.
दाता तू गणपती गजानन
जीवनाच्या प्रत्येक वळणावर,
शब्दांच्या सीमांपलीकडे
तूच अधिष्ठित आधारावर.
कलेतून रुजती संस्कार
संवेदनांच्या स्पर्शातून,
संस्कारांतून घडते संस्कृती
मानवी मूल्यांच्या बीजातून.
यशाभोवती नम्रतेची
स्थैर्याचा अर्थ देई,
अपयशातही नवी दिशा
जगण्याचा ध्यास होई.
माघी गणेशा, एवढीच प्रार्थना
उत्सवापुरती न थांबावी,
अंतरंगात अखंड तेवत
सद्सद्विवेक ज्योत उजळावी.
तुझ्या सान्निध्यात शब्दांना
अर्थाची योग्य वाट लाभावी,
माणूसपणाच्या वाटेवर
सदैव तुझी साथ असावी.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/०१/२०२६ वेळ : १३:०५
Post a Comment