कविता – राष्ट्रग्रंथ : लोकशाहीचा संस्कार
संविधान म्हणजे केवळ
कायद्यांचा संग्रह नाही,
तो तर आहे
राष्ट्राच्या विवेकाने लिहिलेला
काल, आज आणि उद्याला
एकाच विचारसूत्रात गुंफणारा
दीर्घ आत्मसंवाद.
इतिहासाच्या राखेतून
उभा राहिलेला
संकल्पाचा प्रकाश,
शतकांच्या वेदना पेलून
उजेडाची वाट दाखवणारा दीप.
शब्दांआड दडलेली
स्वातंत्र्याची किंमत,
आणि प्रत्येक पानात
मानवी प्रतिष्ठेचा
समानतेचा निश्चल ठसा.
जेथे कायदा
हातात घेण्यासाठी नसून
जपण्यासाठी असलेली
नाजूक जबाबदारी,
जणू विश्वासाच्या काचेत ठेवलेला
न्यायाचा श्वास.
कर्तव्यांच्या मूक उपस्थितीत
स्वातंत्र्य श्वास घेते,
अन्यायाला नकार देत
न्यायाला सामोरी जाणारी
मनाच्या अंतरंगातून उमटलेली,
शांत, निर्भय आणि सजग चेतना.
सत्ता येथे गर्जत नाही,
ती संयमाची भाषा बोलते,
संविधानाच्या मर्यादेत राहून
लोकांच्या हितासाठी
स्वतःला झिजवते.
मतभेद येथे
फाटे फोडत नसून,
विचारांच्या नद्यांवर
उभे केलेले सुवर्णसेतू,
भिन्न प्रवाहांना
एकच दिशा देतात.
बहुसंख्यांच्या आवाजातही
अल्पसंख्यांकांचे अस्तित्व
सन्मानपूर्वक जपणारी
संवैधानिक संवेदना लोकशाहीचे
नाजूक संतुलन जपते.
हा ग्रंथ शिकवतो—
देश म्हणजे केवळ भूमी नव्हे,
देश म्हणजे
माणसामाणसांत जपलेला
विश्वास, सन्मान आणि समानता.
जो राष्ट्रग्रंथ
जाणीवपूर्वक आचरणात आणतो,
तो केवळ नागरिक राहत नाही,
तो लोकशाहीचा
जिवंत संस्कार बनतो
आणि जो हा ग्रंथ
मूल्यांवर ठाम उभा राहून,
न्यायावर विश्वास ठेवून
दररोज कृतीत उतरवतो,
तोच प्रकाशस्तंभ
स्वप्नांना वास्तवाचे पंख देतो,
आणि तोच उद्याचा
भारत घडवत राहतो.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०१/२०२६ वेळ : ११:५२
Post a Comment