कविता – तपश्चर्या


कविता – तपश्चर्या 

मी प्रत्येकाच्या ओठांवर
हसू उमटवत राहिलो,
पण माझ्या ओठांवरचं दुःख
वाचायला
कोणी थांबलंच नाही.

मी सगळ्यांच्या वाटा उजळवल्या,
पण माझ्याच वाटेवर
संध्येचा दिवा
माझ्यासाठी
कुणाच्या हातात
राहिलाच नाही.

मी सगळ्यांचे शब्द
अर्थासकट उचलले,
माझ्या शब्दांसाठी मात्र
ऐकणारी शिल्पं
कधी घडलीच नाहीत.

मी सगळ्यांचा झालो,
आणि म्हणूनच
माझं असं कोणीच
उरलं नाही;
हे सत्य
हळूहळू उमजत गेलं.

मी सगळ्यांसाठी जगलो,
म्हणूनच माझं जगणं
तपश्चर्या झालं—
दिसायला साधं,
पण आतून
अनंत काळासाठी
मीच माझ्या
समोरासमोर.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ११/०१/२०२६ वेळ : ०६:२१

Post a Comment

Previous Post Next Post