कविता – अत्तरासारखी भेट
तुझ्याकडे येणाऱ्या मार्गावर
अनेक पावलांचे ठसे भेटले,
पण मन कुठेच थांबलं नाही—
कुठलाच स्पर्श आपलासा नव्हता.
आणि अचानक
तुझी भेट झाली—
अत्तरासारखी,
श्वासात नकळत मिसळलेली,
न सांगता दरवळणारी.
नातं ठरवलं नव्हतं,
तरी भावना उमलल्या;
हा प्रेमाचा प्रवास आहे की
श्रद्धेच्या सीमेला स्पर्श करणारी
एक अनामिक अवस्था—
तेच उमगेना.
तुझ्या शब्दांचा प्रतिध्वनी
कानांत नव्हता;
तो थेट
मनाचा पत्ता शोधत होता.
रुचिहीन क्षणांनाही
तुझ्यामुळे चव आली,
जणू शुष्क वाळवंटात
अचानक सापडलेलं पाणी.
तुझ्या दिशेने चालताना
कधी गाभाऱ्यात पोहोचलो,
तेच जाणवलं नाही,
आणि मन नकळत नतमस्तक झालं.
सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे,
माझी मात्र तुझ्या डोळ्यांत अडकलेली;
कारण तूच मला
देहातलं आत्मभान शिकवत आहेस.
डोंगरांच्या कुशीत
उजळ दुपार सरते,
तुझ्या लाजऱ्या नजरेत
संध्याकाळ सौम्य होते.
रस्ता लांब आहे,
रात्रीची चाहूल आहे;
पण इतकी खात्री आहे—
सावलीसारखी साथ असल्यावर
अंधारही उजेड ठरणार आहे.
ही भेट
ना फक्त धार्मिक,
ना फक्त प्रेमाची;
मनाला हलवणारी,
विवेक जागवणारी
एक सुंदर अनुभूती.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०९/०१/२०२६ वेळ : ०६:२१
Post a Comment