कविता – लोकशाहीचा दीपस्तंभ (मराठी पत्रकार दिन)


कविता – लोकशाहीचा दीपस्तंभ
(मराठी पत्रकार दिन)

शाईत भिजलेली लेखणी
दररोज सत्याचा शोध घेताना,
कागदावर उमटते तेव्हा
लोकशाहीला नवा श्वास मिळतो.

भीतीच्या दाट सावल्यांतून
निर्भीड प्रश्न उभे राहतात,
आणि मौन फोडणारा शब्द
इतिहासाला नवी दिशा देतो.

सत्तेच्या उंबरठ्यावर
वाकणं न शिकलेली मान
जनतेच्या वेदनांचा भार
निःस्वार्थपणे पेलत राहते.

चमकदार मथळ्यांपलीकडे
दडलेली माणसं स्पष्ट दिसतात,
कारण पत्रकाराचं हृदय
संवेदनशील आणि सदैव सजग असतं.

ना पुरस्कारांची अपेक्षा,
ना सुरक्षिततेची खात्री;
तरीही लेखणी उभी राहते
सत्याच्या बाजूने, निर्भयपणे ठाम.

केवळ बातमी देण्यासाठी नव्हे—
तर माणूस 
माणूस म्हणून जिवंत राहावा;
म्हणूनच मराठी पत्रकार
लोकशाहीचा दीपस्तंभ ठरतो.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०६/०१/२०२६ वेळ : १७:५५

Post a Comment

Previous Post Next Post