कविता – बाप – सब्जेक्ट की ऑब्जेक्ट?
बाप
आपल्या आयुष्याच्या
सिलॅबसमध्ये कधीच
महत्त्वाचा वाटत नाही;
तो असतो
फक्त ऑप्शनला टाकलेला सब्जेक्ट—
वाचायचा तर वाचा,
नाही वाचला
तरी गुण कुणाचे कमी होत नाहीत,
असे गृहीत धरून
आपण पुढे निघून जातो.
आईचा धडा
भावनांनी ओथंबलेला असतो,
पानोपानी मायेची ओल असते;
पण बापाचा धडा
कडक कागदावर
पेन्सिलीच्या टोकासारखा—
खडबडीत,
तरीही आयुष्याच्या
रेषा आखणारा.
कोणी विचारत नाही
“बाबा, तू कसा आहेस?”
पण तो मात्र
नेहमी विचारतो—
“पिल्ला, तुला काय हवं आहे?”
त्या प्रश्नात
माया दिसत नाही,
पण जबाबदारीची
दडपलेली भीती
तिथे शांतपणे
श्वास घेत असते.
स्वतःची स्वप्नं
तो कायम
शेवटच्या कप्प्यात ठेवतो,
आणि लेकरांच्या भविष्याला
त्याच्या जीवनाचं
मुख्य वाक्य बनवतो.
त्या वाक्यातील
क्रियापद
बहुतेक वेळा
मुलंच शोधत राहतात,
आणि बाप
हळूच
कर्म होऊन जातो.
तो रडत नाही
म्हणून त्याला वेदना नाहीत,
असा गैरसमज केला जातो;
पण त्याच्या थकलेल्या डोळ्यांत
रात्री उशिरा
आपलीच स्वप्नं
जागत असतात,
आणि आपण मात्र
झोपेचं सोंग घेतलेलं असतं.
बाप
कधीच हिरो नसतो
कथेच्या पहिल्या पानावर;
तो असतो
शेवटच्या पानामागे—
जिथे
लेखकाचं नावही नसतं,
पण संपूर्ण पुस्तक
त्याच्याशिवाय
अर्थहीन ठरतं.
त्याला
मुख्य घटक म्हणून
कधीच गंभीरपणे घेतलं जात नाही;
तो हळूहळू
रिजेक्ट केलेला ऑब्जेक्ट होतो—
जबाबदाऱ्यांचा,
अपेक्षांचा
आणि आपल्या
कृतघ्न मौनाचा.
पण एक दिवस
“बाप” नावाचा
सिलॅबस संपतो,
आणि आयुष्य
अचानक प्रश्नपत्रिका फेकतं—
तेव्हा उमगतं,
बाप हा
सोपा धडा नव्हता,
तोच सर्वांत कठीण धडा होता,
उत्तरही होता,
आणि आपण
फक्त गुणांच्या नादात
त्याला विसरून गेलो होतो.
म्हणूनच
आज गरज आहे
नवा अभ्यासक्रम ठरवण्याची—
जिथे
“बाप”
हा ऑप्शन नसून
अनिवार्य धडा असेल;
तो धडा
वेळीच जगता आला,
तरच आयुष्य
खऱ्या अर्थाने पास होतं.
कारण
जीवनाच्या अभ्यासक्रमात
“बाप”
हा आयुष्याचा
तो धडा आहे—
जो संपल्यानंतर नाही,
तर समजून घेतल्यावरच
कायमचा शिकवतो.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २८/१२/२०२५ वेळ : ११:२५
Post a Comment