कविता – मूक प्रतिष्ठा


कविता – मूक प्रतिष्ठा 


तुझे अपशब्द
तुझ्याच मर्यादेचा आरसा असतात;
आमची शांतता
आमच्या संस्कारांची सही असते.

आम्ही शब्द लिहितो,
तेव्हा तुझ्या अंतर्मनाला आग लागते—
कारण शब्द आरसा असतात,
आणि आरशात
अज्ञान उघडपणे पडतं.

आम्ही कविता लिहितो,
तू असभ्यतेची निवड करतोस.
फरक एवढाच—
आम्ही अर्थ उलगडतो,
तू आवाज वाढवतोस.

अर्थ न समजले,
की तुझी ओरड सुरू होते;
समज कमी पडली,
की संयम गळून पडतो.
अर्थहीन आरोळी
कमी पात्रतेचं लक्षण ठरतं.

शब्दांचा दर्जा
कंठाच्या उंचीवर नाही ठरत;
तो ठरतो
मनाच्या खोलीवर,
विचारांच्या प्रामाणिकपणावर.

आम्ही मौन धरतो—
भीतीपोटी नाही,
तर विश्वासामुळे.
कारण मौनातही
संवादाची ताकद असते.

शब्द शस्त्र नाहीत,
ते जबाबदारी असतात;
आणि जबाबदारी
ओझं नसतं—
ती संस्कृती असते.

म्हणूनच,
आम्ही उत्तर देत नाही
प्रत्येक आरोळीला;
कारण प्रत्येक आवाज
ऐकण्यास पात्र नसतो.

इतिहासात गोंगाट टिकत नाही,
तर अर्थ टिकतो;
अपशब्द विसरले जातात,
पण शब्द जपले जातात.

म्हणून,
तू ओरडत राहा—
आम्ही लिहीत राहू.
कारण
मूक प्रतिष्ठा
हीच आमची
खरी ओळख आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २४/१२/२०२५ वेळ : ०५:२२

Post a Comment

Previous Post Next Post