लघुकथा – मूक शक्ती
संध्याकाळची वेळ होती. घरात दिवा लागला होता; अंगणात अंधार हळूहळू पसरत होता. त्या अंधारातही आई स्वतःला विसरून स्वयंपाकघरात उभी होती—जणू तिच्या आयुष्यात ‘थांबा’ नावाचं बटणच नव्हतं. गॅसवर भाजी शिजत होती; तिचा दरवळ घरभर पसरत होता. कपाळावर घाम, डोळ्यांत थकवा असूनही ओठांवर नेहमीसारखं शांत हास्य फुललेलं होतं.
“आई, तू बस जरा. मी करून घेते,” मी म्हणाले.
आई हलकेच हसली.
“अगं, तू आत्ताच आलीस ना. जा हातपाय धुऊन घे. मी चहा ठेवते. बाबाही येतील इतक्यात. तुम्ही दोघं घरात आलात की मला थकवा जाणवतच नाही.”
त्या एका साध्या वाक्यात किती आयुष्य दडलं होतं, हे मला तेव्हा उमगलं नव्हतं.
आई रोज पहाटे उठायची. एकदा मी तिला विचारलं,
“आई, आज सुट्टी आहे, तरी इतकी लगबग कशाला?”
ती शांतपणे म्हणाली,
“सुट्टी तुला असते; जबाबदाऱ्यांना नसते.”
सकाळचा बाजार, पाणी भरणं, बाबांचा डबा, माझं कॉलेज, आजीची औषधं—सगळं तिच्याच खांद्यावर असायचं. वेळेची किंमत, शिस्त आणि कर्तव्याची जाणीव तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती.
“आई, तुला स्वतःसाठी वेळ नाही का?” मी एकदा विचारलं.
ती हसली.
“स्वतःसाठी… म्हणजे काय? तुम्ही सुखी असाल, तर माझं जगणं पूर्ण आहे.”
शाळेतून शिक्षकांनी दिलेल्या सूचना ती आवर्जून लक्षात ठेवायची. पालकसभेला जाताना ती ठामपणे म्हणायची,
“तुला जितकं शिकायचंय तितकं शिक. तुझ्या शिक्षणाच्या आड काहीच येणार नाही.”
एकदा कॉलेजची फी भरण्याची वेळ आली. बाबांची परिस्थिती बेताची होती. त्या रात्री आई उशिरापर्यंत जागी राहिली. दुसऱ्या दिवशी तिनं शांतपणे लग्नाचे दागिने मोडीत काढले.
“आई, नको ना…” मी रडत म्हटलं.
ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
“दागिने परत बनवता येतील; पण शिक्षणाची संधी परत येणार नाही.”
त्या रात्री मला उमगलं—आईनं दागिने मोडीत काढले नव्हते; तिनं समाजाच्या ठराविक चौकटी मोडल्या होत्या.
एकदा कॉलेजमधून परत आल्यावर लक्षात आलं—आई पाय दुखत असल्याचं लपवत होती. चालताना किंचित अडखळत होती. चेहऱ्यावर हास्य होतं; पण त्या हास्यामागची वेदना तिच्या थरथरणाऱ्या हातांतून स्पष्ट दिसत होती.
“आई, चल डॉक्टरांकडे जाऊ या,” मी आग्रह केला.
ती म्हणाली,
“आधी तुझी परीक्षा संपू दे. माझं दुखणं कुठं पळून जाणार आहे?”
त्या क्षणी उमगलं—आई स्वतःपेक्षा नेहमीच दुसऱ्याला पुढे ठेवते. तिच्या वेदनांना वेळ नसतो; पण आमच्या स्वप्नांसाठी ती स्वतःची हाडं झिजवून वाट तयार करते.
आईनं स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. गावात दहावीनंतर मुलींनी शिकणं म्हणजे चैन समजली जायची. “लग्न करा, संसार पाहा,” एवढंच भविष्य ठरलेलं असायचं. आईनं ते गप्पपणे स्वीकारलं; मात्र माझ्यासाठी तिनं शिक्षणालाच आयुष्याचं ध्येय केलं.
“आई, मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं होतं?” मी एकदा विचारलं.
तिनं भांड्यांचा आवाज थांबवला आणि हळूच म्हणाली,
“मला काही व्हायचं नव्हतं. पण तू तुझं ध्येय सोडू नकोस.”
त्या एका वाक्यात तिची मूक क्रांती, निःशब्द त्याग आणि अपूर्ण स्वप्नांची कहाणी दडलेली होती.
शेजारच्या काकूंनी एकदा टोमणा मारला,
“इतकं शिकवून काय करायचं? शेवटी स्वयंपाकघरातच येणार ना?”
आई शांतपणे, पण ठामपणे म्हणाली,
“स्वयंपाकघरात उभं राहायलाही बुद्धी लागते. आणि बाई शिकली, तर घर सुधारतं; घर सुधारलं, तर समाज घडतो.”
तिचा आवाज मोठा नव्हता; पण विचार वज्रासारखे ठाम होते.
अपयशाच्या एका क्षणी मी खचून गेले होते. तेव्हा फोन आला. आईचा जिव्हाळ्याचा आवाज ऐकताच मन स्थिर झालं.
“रडू नकोस. उभं राहायला शिक. मी तुझ्या पाठीशी आहे—प्रत्येक पावलावर.”
त्या क्षणी मला जाणवलं—आई माझ्या पाठीशी उभी नव्हती; ती माझ्यात उभी राहिली होती.
आज आईचे केस पांढरे झाले आहेत, हात थरथरतात; पण डोळ्यांत अजूनही तेच न थकणारं, निःस्वार्थ प्रेम आहे.
मी नोकरीसाठी घराबाहेर पडताना ती म्हणाली,
“स्वतःची किंमत विसरू नकोस. आणि कुणाचंही दुःख दुर्लक्षित करू नकोस.”
आज मागे वळून पाहताना जाणवतं—आई केवळ माझी माता नाही; ती एक संस्था आहे. ती स्वतः झिजते, पण पुढची पिढी घडवते.
आई केवळ जन्म देत नाही—
ती प्रश्न विचारण्याचं धैर्य देते,
अन्यायाला नकार देण्याची ताकद देते
आणि स्वतःचा आवाज शोधायला शिकवते.
ती स्वतः इतिहासात लिहित नाही;
पण इतिहास घडवणाऱ्या हातांमध्ये चेतना जागवते.
म्हणूनच आई ही केवळ भावना नाही—
ती समाज बदलणारी मूक शक्ती आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/१२/२०२५ वेळ : ०४:२३
Post a Comment