कविता – भक्तीचा आरसा


कविता – भक्तीचा आरसा 

रस्त्यांच्या वळणावळणांवर,
धूळ उडवत चाललेले जथ्थे—
वेशीवर सोनेरी झळाळ,
पण मनात मात्र खोल पोकळी.

तुकारामांचा साधा वारसा,
ज्ञानेश्वरांची शांत दिव्यता—
काळाच्या गर्दीत हरवली जणू;
उरला फक्त ढोल-ताशांचा गडगडाट,
दिखाव्याचा कोलाहल.

डोळ्यांत लालसा, भस्मासारखी,
गळ्यात मोत्यांच्या माळा;
तपश्चर्या सजली मिरवणूक म्हणून,
आणि भक्ती हरवली 
पैशांच्या धुरकट सावलीत.

कीर्तन, प्रवचन—
होतात कुणासाठी?
मनातला देव,
तो तर केव्हाच दूर निघून जातो,
जेव्हा श्रद्धा बाजारात
विक्रीला काढली जाते.

गल्लोगल्ली उभी दगडी देवळे,
पण माणसांच्या मनात खोल भगदाड;
देवळात बसलेले 
थकलेले चिंताग्रस्त चेहरे,
काळजीच्या रेषांनी भरलेले,
डोळ्यांत आशेचा किरण नाही;
गरिबाच्या ओंजळीत
कृपेचा थेंबही पडत नाही.

तुका विचारतो—
देव कुठे आहे?
हीच का भक्तीची पर्वणी?
आत्म्याची साधी भाकर
स्वार्थाच्या मेजवानीत हरवली;
देवही थकून बसला असेल,
मनुष्याच्या स्वार्थाच्या वेशीवर.

आज श्रद्धाच हरवली आहे,
त्यामुळे अंतर्मनाला जागं करायला हवं —
कारण 
साधेपणा, प्रेम, विश्वास—
हाच खरा भक्तीचा आरसा.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०२/१२/२०२५ वेळ : १०:५३

Post a Comment

Previous Post Next Post