कविता – विवेकाचा शाश्वत प्रकाश


कविता – विवेकाचा शाश्वत प्रकाश

विवेकाचा शाश्वत प्रकाश—
उषःकालाच्या क्षितिजावर हळुवार उगवणारा 
पहिला सूर्यकिरण;
जिथून मनाच्या आकाशात 
जाणिवेचा, विचारांचा आणि प्रकाशाचा
नवा, शांत, तेजस्वी सोहळा सुरू होतो.

घराच्या अंगणात
काळ्या पाटीवर 
खडूने पहिल्यांदा "श्री" लिहिताना
त्या पांढऱ्या रेषेतून उगवतो 
ज्ञानाचा पहिला चमत्कार,
तोच वाचनाचा जन्मक्षण.
त्या एका अक्षरातून
विश्वाच्या अनंत शक्यता,
गूढ जगाची असंख्य दारे उघडतात.

आजोबांच्या थरथरत्या हातातील पुस्तक
पानं उलटताना,
त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव
शब्दांच्या ओलसर किनाऱ्यावर
आपल्याशी कुजबुजतो—
ज्ञानाचा, संयमाचा, शांततेचा
अक्षय, अविनाशी स्वर बनून.

रात्रीची शांतता घट्ट होत आली की
आई मंद उजेडात
हळूच उघडते तिचं जपलेलं पान—
कारण वाचन हा तिचा
स्वतःकडे परत जाण्याचा
एकमेव नितळ मार्ग.

पुस्तक उघडताच
शब्दांची सळसळ
मनाच्या उंबरठ्यावर
पहिल्या पावसासारखी थबकते;
आणि विचार उमलतात
विटलेल्या स्मरणांच्या ओलाव्यातून,
आणि जगण्याला मिळतो
एक नवा श्वास, नवा स्पर्श, नवे आकाश.

एखादी कथा—
थकलेल्या अंतःकरणाचं
हळुवार सांत्वन करते,
तर एखादा प्रसंग—
तुटलेल्या विश्वासाचे दगड
पुन्हा जोडून उभारतो 
समजुतीचे शांत, पवित्र देवालय.

वाचन म्हणजे
चिंतनाच्या आकाशात
भरारी घेणारा मुक्त पक्षी,
जो दुविधा, अंधश्रद्धा, भिती
यांच्या पिंजऱ्यातून 
निर्भीडपणे बाहेर पडतो.

वाचन म्हणजे
मनाशी, आत्म्याशी, अनुभवाशी
दररोज नव्यानं बांधलेला
सूक्ष्म, अंतरंग, गहिरा संवाद;
आतल्या सावल्यांना ओळखून,
धैर्याच्या दीपस्तंभापर्यंतचा
अवघड, पण तेजोमय प्रवास.

पुस्तकातील प्रत्येक ओळ
मनाच्या खोल कप्प्यांत
अनुभूतींचं सोनं साठवते;
शब्द झिरपतात
आणि मग उमजतं—
बदल हा बाहेरचा नसतोच
तो आपल्या आतच 
प्रकाश पसरवत असतो.

जेव्हा अंधार दाटतो—
तेव्हा हातातलं पुस्तकच
पहिल्यांदा उजळतं;
आणि मनात घुमतो 
एकच प्रांजळ नाद–
“वाचन जागवितो विवेक.”

कारण
वाचन हे फक्त पानांतलं अक्षर नसतं—
ते असतं
घडण्याचं, घडवण्याचं,
पुन्हा उभं राहण्याचं,
आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचं
शांत, गहिरे, अढळ सामर्थ्य.

वाचत राहणे
हेच मनुष्याचे
खरे स्वातंत्र्य,
खरी साधना,
आणि खरी क्रांती.

आणि म्हणूनच–
शब्दांचा हा दीप
जोपर्यंत हातात, हृदयात,
आणि जगण्याच्या प्रवासात सोबत असेल—
तोपर्यंत कुठलीच रात्र कधीच 
पूर्ण अंधकारमय होऊ शकत नाही.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ३०/११/२०२५ वेळ : ११:२५

Post a Comment

Previous Post Next Post