कविता – शब्दातील मौन
शब्दातील मौन…
किती विलक्षण असतं ना हे मौन—
दिसत नाही,
पण हृदयाच्या सर्वांत खोल ठिकाणी
सतत जळत राहतं—
निखाऱ्यासारखं, अगदी शांत
अणि अग्नितप्त.
कथेतल्या पात्रांच्या
डोळ्यांच्या ओलसर कडांत,
श्वासाच्या मंद थरथरीत,
अंतर्मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत
अडकून राहतात
हे शब्दातील मौन.
मौन म्हणजे फक्त शांतता नाही—
ते दबलेला उसासा,
उघड न पडलेली भीती,
गुंतलेली आस,
आणि कधी कधी—
स्वतःशी भिडण्याची न बोललेली कबुली.
घरांच्या भेगांत,
नात्यांच्या तुटक्या सांध्यांत,
कधी मनाच्या गहिर्या विहिरीत
असे शब्द जन्मतात—
जे उच्चारले तर जग बदलून जाईल,
आणि गिळले तर
स्वतःचं अस्तित्वही विरघळून जाईल.
म्हणूनच माणसं
बहुतांश वेळा शांत राहतात—
नजर आकाशात हरवते,
पायाखालची जमीन पोकळ होत जाते,
आणि मनांतल्या लाटा
गुपचूप उसळत राहतात.
कधी मौन निषेधाचं—
वणव्याप्रमाणे शांत,
पण आतून सर्वस्व जाळणारं.
कधी मौन वेदनेचं—
जखमेवर हात ठेवल्यासारखं
उघड झालं तर पुन्हा रक्ताळणारं.
आणि कधी मौन प्रेमाचं—
जे शब्दांत उतरत नाही,
आणि न उच्चारलं तर
सावली बनून चालत राहतं श्वासांवर.
मौनातून उमलणारे शब्द
अवघं जग हलवू शकतात—
कारण त्यांना
अनुभवाची धार असते,
वेदनेचं तापमान असतं,
आणि आत्म्याच्या काळोखातून
जन्मलेला उजेडही.
नाटकातील पात्र
जेव्हा दीर्घ थांबा घेतं,
तेव्हा मंचावर पसरणारी शांतता
शब्दांपेक्षा अधिक तीव्र होते—
ही शांतता म्हणजे
जाणिवेचा ठिणगी लावणारा क्षण.
प्रत्येकाच्या आयुष्यात
असं एक ठिकाण असतंच—
जिथे शब्द अपुरे पडतात,
आणि मौन
संपूर्ण कथा सांगतं.
हे मौन कधी
आईच्या डोळ्यात दाटतं,
वडिलांच्या पावलांत जड होतं,
लेकरांच्या हाती थरथरतं,
आणि प्रेमिकांच्या ओठांवर
अनुच्चारित राहतं.
शब्दातील मौन…
ही फक्त कथा नाही—
ही जगण्याची धग,
आत्म्याचा आरसा,
मनाशी झालेली अनिवार भिडंत.
शब्द कोसळतात…
मौन तगून राहतं.
शब्द कठोर होतात…
मौन खोल जातं.
आणि म्हणूनच
या कथेतलं मौन
हे केवळ शांततेचं नाव नाही—
ते आहे सत्याचं उघडं दार.
त्यातून प्रेक्षक स्वतःला पाहतात—
आपल्या वेदना, अपूर्णता, भीती,
आणि अगदी नाकारलेलं सत्यही.
लक्षात ठेवा—
उच्चारलेले शब्द क्षणात विरतात,
पण शब्दातील मौन…
हे मनात थरथरत राहतं,
आणि हृदयाच्या तळाशी
आपली जखम, आपली ओढ
शांतपणे कोरून जातं.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २०/११/२०२५ वेळ : २३:४०
Post a Comment