कविता – आनंदाश्रम


कविता – आनंदाश्रम

आनंदाश्रम…
नाव जरी ‘आनंद’ घेऊन भेटतं,
तरी उंबरठा ओलांडताच
काही न बोललेले हुंदके
डोळ्यांच्या कडांना स्पर्शून 
गालावरती येऊन थांबतात.

इथे वेळही
चिरंतनतेच्या दाराशी थांबते –
धीरगंभीर, शांत, विचारमग्न;
गेल्या दिवसांची पानं
पुस्तकातून अलगद सुटून
वातावरणात आठवणींचा मंद गंध पसरवतात.

खिडक्यांपाशी बसलेले
कातर नजरेचे काही थकलेले जीव
स्वतःचीच वाट पाहत असतात—
जणू दाराशी कधी तरी 
स्वतःचंच पाऊल परत येईल अशी आस.

काहींच्या ओठांवर
विस्मृतीचा कडू चषक टेकलेला,
काहींच्या आठवणीत
फक्त एका हाकेचा आवाज—
“आई… बाबा… मी आलोय!”
ही हाक कधीच विरत नाही; 
ती मनाच्या चिरंतन सभागृहात 
सतत घुमत राहते.

आनंदाश्रमातील
प्रत्येक खोली म्हणजे
एक अतिशय अवघड धडा—
जवाबदारीचा, माणुसकीचा,
आणि प्रेमाच्या 
खर्‍या, शुद्ध परिभाषेचा.

कापऱ्या हातात 
वयोमानाचा कंप असतो,
पण मनात ?
उबदारपणाची ऊब—
नवीन नात्यांच्या उजेडात
ते स्वतःचं जीवन 
पुन्हा पुन्हा शिवत राहतात.

इथे एखादे आजोबा
तुमच्याशी बोलू लागले की,
जगाच्या साऱ्या अनुभवांचा खजिना
अक्षरागणिक तुमच्या ओंजळीत ठेवतात,
आणि तुम्ही अनाहूतपणे,
न बोलता, न जाणवता,
शहाणपणाने थोडं मोठं होता.

एखादी आजी
भाजणीचा वास सांगता सांगता
स्वतःचे आयुष्य चाळणीवर टाकते;
तिच्या कथा 
गोड-तिखट आयुष्याचा वास
जीवनाच्या वेलदोड्यांसारख्या
वाऱ्यात मिसळत जातात.

कधी एखाद्याच्या डोळ्यांत
धूसरलेला वेदनेचा सागर दिसतो,
तर कधी एखाद्या हसण्याचा
निर्मळ झरा
निद्रिस्त आवाराच्या शांततेला
अचानक हलवून सोडतो.

हा आश्रम—
फक्त वृद्धत्वाचा थांबा नाही,
हा आपलेपणाचा श्वास
तुटू नये म्हणून
जीवापाड प्रयत्न करणाऱ्या 
मनांचा उबदार संसार आहे.

आणि आपण…?
आपल्या धकाधकीच्या दिवसांत
अंधुक झालेल्या या चेहऱ्यांची
एकदा का होईना—
ओळख पटवून घ्यावी,
त्यांच्या हातात 
आपल्या स्पर्शाचं ऊन
थोडसं तरी ठेवावं.

कारण—
नात्यांचा वृक्ष
मुळे खोल असतील
तेव्हाच फुलतो;
आणि ती मुळे
आपल्याच पावलांच्या खाली
शांतपणे थांबून असतात.

आनंदाश्रम…
इथे माणूस
वयाने नाही,
तर एकटेपणाने वृद्ध होतो;
आणि प्रेमाने—
पुन्हा नव्याने जगूही लागतो.

या नावातला ‘आनंद’
आपल्या भेटीनेच परिपूर्ण होतो—
आणि आपण तेथून बाहेर पडताना
मनात एक हलकीशी जाणीव घेऊन निघतो—
की आज आपण
थोडेसे का होईना…
अजून माणूस झालो.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १९/११/२०२५ वेळ :२२:४१

Post a Comment

Previous Post Next Post