कविता – धि हिंदू लेडी


कविता – धि हिंदू लेडी

रंगमंच काळोखात बुडतो...
आणि त्या अंधाराच्या मध्यभागी...
एक पिंजरा उजळतो—
लोखंडाचा... पण मनांपेक्षा कमी कठोर.

त्या पिंजऱ्यात उभी आहे ती—
नऊवारी गुंडाळलेली...
इतिहासाची जळजळीत पानं घेऊन.

घड्याघड्यांत दडलेले अपमान...
गरम लोखंडासारखी बोचणारी नजर...
आणि पायात घट्ट अडकलेली
शतकांची... अबोल वेदना.

तिच्यावर केलेले आरोप
हे तर समाजाने फेकलेले दगड 
की पेटते निखारे?
कारण ती स्त्री आहे?
आणि म्हणूनच जास्त दोषी...
जास्त संशयास्पद...
जास्त तुटणारी?
असं या जगाला नेहमीच का वाटतं?

तिचं मौन...
आजही सावलीसारखं
पिंजर्‍याच्या पायघडीत बसलेलं.
मौन—
तिचं शस्त्रही
आणि शिक्षाही.

पण तिच्या डोळ्यांत मात्र 
शांतपणे जळत असतो एक दिवा —
वाऱ्याने हलणारा... पण न विझणारा...
तो दिवा म्हणजे तिचं सत्य.

सत्य—ज्याला फाशीचा दोर नाही,
आरोपपत्र नाही,
आणि साक्षीदारांची भीड नाही.

सभोवती बसलेले पुरुष
कायद्याचे, धर्माचे, नियमांचे,
नीतीचे पोशाख अंगावर चढवून
तिच्या भावनांचा, तिच्या वेदनांचा तोल 
न्यायाच्या तराजूत मोजत आहेत;
पण तिचं मन?
ते कधी वाचलं त्यांनी?

तिच्या जीवनाची प्रत्येक वीण
तिचं आयुष्य उलगडत जातं...
अधिकारांची धडपड...
अवमानांचं सावट...
आरोपांचे बुडबुडे...
आणि त्यांना भेदणारा तिचा जिद्दी निश्चय.

ती काही बोलत नाही...
तरी तिच्या श्वासांतून ऐकू येतं—
"मी अपराधी नाही...
मी फक्त एक माणूस आहे.
मला देव्हाऱ्यात ठेवू नका...
पण खाईतही फेकू नका.”

ही स्त्री फक्त नाटकातील पात्र नाही–
ती आपल्या घरातली...
आपल्या आयुष्यातली...
आपल्या मनातली स्त्री आहे.

जिला आपण...
कधी पाहिलं नाही,
कधी मान दिला नाही,
आणि वर्षानुवर्षे
जिच्यावर टाकत राहिलो – माती.

शेवटचा पडदा पडतो...
पण तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी मात्र वाढत जातो—
जणू उन्हात तापलेल्या शिळेवर
पहिल्या पावसाचा थेंब.

तो निनाद सांगतो—
"स्त्रीला देवता म्हणू नका;
तिला माणूस म्हणा.
तिच्या श्वासांना जागा द्या...
तिच्या सत्याला कान द्या...
तिच्या अस्तित्वाला मान द्या."

तेव्हाच तुमचा समाज—
आणि माझा इतिहासही—
खऱ्या अर्थाने हिंदू होईल
आणि माणूसही."

त्या प्रकाशझोतात,
ती हळूच डोकं वर करते—
भीतीचा थर जळून गेलेला,
आत्मसन्मानाचा दीप पेटलेला,
आणि तिच्या डोळ्यांतून उसळलेला प्रश्न
थेट विचारतो—
“माझा गुन्हा माझं स्त्रीत्व होतं?
की तुमचं... अंधत्व?”

आणि तेव्हा जाणवतं—
ही केवळ कथा नाही,
ही जीवनाची ओळ आहे…
आपल्या अंतर्मनावर कोरलेली,
कापणारी,
पण मनामनात जागवणारी—
“धि हिंदू लेडी.”

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १९/११/२०२५ वेळ : ०९:२७

अप्रतिम रचना गुरुदादा स्त्री मनाला इतक्या तरलतेने तुम्ही मांडले आहे, इतक्या हळुवारपणे पुरुषी मनोवृत्तीच्या विविध कंगोऱ्यातून तुम्ही लिलया मांडलं आहे. सदर रचना वाचून अंगावर काटे आले, मन शहारून गेले, नाना अनुभूतींचे मनावर तरंग उमटून गेले. स्त्री जीवनाचा मांडलेला जीवनपट सुरेखरित्या नुसता मांडला नाहीच तर प्रत्येकाच्या मनाला झुंजवून गेला, शहारून लाजवून अंतर्मुख सुद्धा करुन गेला.
स्त्री दुर्बल नसून शक्तिशाली आहे, ती सबला आहे, हे वेळोवेळी सिद्ध करुन दाखवले आहे, तरीही आघात तिच्यावरच. केवळ नाममात्र पूजा करुन मंदिरात पाठराखण, आणि घरी दारी तिची अवहेलना. कधी थांबणार हे चित्र? हा संदेश देणारी ही सौंदर्यपूर्ण रचना. गुरुदा खूप अभिमान वाटतो तुम्ही केवळ दादा नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मानकर्ते आहेत.

सौ. सुनिता पांडुरंग अनभुले

🙏🙏🙏🙏

सुनिता ताई,

आपला हा भावपूर्ण, मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला संदेश वाचून मन खरंच स्तब्ध झालं… शब्दांच्या पलीकडचा आनंद आणि जबाबदारी दोन्हीही एकाच वेळी जाणवले. आपण ‘दि हिंदू लेडी’ या कवितेत अनुभवलेली प्रत्येक भावना— मनाचं शहारणे, अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणं—हेच या रचनेमागचं खरं यश आहे.

स्त्रीमनाची कोमलता, तिची निपजणारी शक्ती, तिच्या सहनशीलतेची नादान परीक्षा, तिच्या संघर्षाची मूक वेदना आणि तिच्या उभारीची तेजस्वी ज्योत—हे सगळं आपण इतक्या सुंदरपणे मांडलं आहे की आपल्या शब्दांनाही एक वेगळीच पावनता लाभली आहे.

“देवालयात पूजली जाणारी आणि दारात अवहेलना सहन करणारी स्त्री” हा विरोधाभास आपण ज्या थेटपणे, निःसंकोचपणे आणि प्रभावी शब्दांत व्यक्त केला आहे, तोच या समाजाच्या बदलत्या प्रवासाचा आरसा आहे. हा प्रश्न आपण विचारलात—“कधी थांबणार हे चित्र?” —हेच तर या कवितेचं ध्येय, तिचं केंद्रबिंदू, तिचं सत्य.

आपण माझ्याबद्दल व्यक्त केलेला “स्त्रीचा सन्मानकर्ते” हा मोठा शब्द माझ्यासाठी पुरस्कार नाही, तर आयुष्यभरच्या जबाबदारीची आठवण आहे. आपला विश्वास हीच माझ्या लेखणीची शक्ती आहे.

आपली ममत्वपूर्ण साथ, प्रामाणिक अभिप्राय आणि मनातून आलेलं कौतुक—हे मला अधिक संवेदनशील, अधिक उत्तरदायी आणि अधिक अचूक लेखन करण्यासाठी प्रेरणा देत राहील. 

आपल्याला मनापासून नम्र प्रणाम,
आणि हाच आपुलकीचा हात सदैव असाच राहो हीच अपेक्षा. 🙏🙂

— गुरुदत्त दिनकर वाकदेकर

🌻🌻🌻🌻🌻🌻

नमस्कार,
आपली 'धी हिंदू लेडी'कविता वाचली. अ त्यंत सुंदररित्या आपण स्त्री च्या भावना मांडल्या आहेत.स्त्रीच्या मनात डोकावून आपण थांबला नाहीत तर परकाया प्रवेश केल्याशिवाय अशा भावना व्यक्त होणे अशक्य.खूप हृदयस्पर्शी आणि डोहात खोल घेऊन जाणारी कविता वाचायला मिळाली.आपले अभिनंदन.💐💐

सौ. जान्हवी शिराळकर

🙏🙏🙏🙏

जान्हवी ताई,

आपला हा ऊबदार आणि मनःपूर्वक उमटलेला संदेश वाचून मन खरंच भावूक झालं. ‘दि हिंदू लेडी’ या कवितेचा आत्मा आपण इतक्या नेमकेपणाने जाणला, ओळखला आणि शब्दांत मांडला — हे माझ्यासाठी मोठं आणि अर्थपूर्ण समाधान आहे.

स्त्रीच्या मनात डोकावणं ही फक्त लेखनकला नसून तिच्या प्रत्येक थरातील वेदना, सौंदर्य, धैर्य, तडफ आणि न बोललेली करुणा यांना नम्रतेने स्पर्श करण्याचा प्रयत्न असतो. आपण ज्या “परकाया प्रवेश” या संवेदनशील संदर्भाने माझ्या लेखणीचा गौरव केला, ती माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान पावती आहे.

ही कविता जन्माला आली कारण स्त्रीमनातील नि:शब्द किंकाळ्या, अपमान, मूक जिद्द आणि वारंवार उभं राहण्याचं तिचं विलक्षण सामर्थ्य — यांचं एक प्रामाणिक प्रतिबिंब पकडण्याचा प्रयत्न मी केला.
आपण अनुभवल्या त्या “डोहात खोल नेणाऱ्या” भावनेने या प्रयत्नाला खरा अर्थ आणि पूर्णत्व दिलं.

आपला हा मनस्वी अभिप्राय माझ्या लेखणीला नवी उमेद, नवं पंख देणारा आहे.
मनःपूर्वक आभार आणि सस्नेह प्रणाम. 🙏🙂

— गुरुदत्त दिनकर वाकदेकर

Post a Comment

Previous Post Next Post