कविता – चिमणी
फांदीवर बसलेली एक चिमणी —
ना मुकुट... ना तोरा...
पण तिच्या पंखात भरलेली —
सकाळची आशा... आणि आकाशाचा नवा अर्थ!
तिला ना महाल हवेत,
ना लोखंडी जाळ्या —
ती उडते मोकळी,
वाऱ्याशी बोलत, ढगांशी खेळत,
आणि शिकवते...
“आनंद मिळवायचा, तर स्वच्छंदी जग!”
माझ्या खिडकीजवळ ती दररोज येते,
तिचं मृदू अस्तित्व घेऊन...
ती न बोलता सांगते —
“माणसा, तू इतका का गोंधळला आहेस?
तुझं आकाश अजूनही तुझंच आहे,
फक्त तू बघायला विसरला आहेस!”
तिचा चिवचिवाट म्हणजे
प्रभातीच्या रंगात मिसळलेला
आशीर्वादाचा स्वर.
ती उडताना म्हणते —
“स्वप्नं मोठी असू देत,
पण पाय मातीवर ठेव!”
ती नांदते प्रेमात —
कधी जोडीदाराच्या चोचीतून मिळालेल्या दाण्यात,
कधी पिल्लांच्या किलबिलाटात,
कधी पावसाच्या सरीत ओल्या पंखांच्या थरथरीत...
पण आता...
ती कमी दिसते...
आपल्या गोंगाटात, धुरात,
आपल्या वाढत्या अपेक्षांनी
तिचं आकाश हिसकावलंय.
काचेच्या इमारतींनी तिचं घर घेतलं,
मोबाइलच्या टॉवरांनी तिचं गीत चोरलं...
ती जवळ येत नाही —
फक्त दूर उडते...
त्या माणसापासून जो विसरला आहे —
“उडणं म्हणजे फक्त यश नव्हे,
ते स्वातंत्र्य आहे!”
चिमणी पुन्हा यावी असं वाटतं ना —
फक्त अंगणात नव्हे,
आपल्या मनातही...
तर पुन्हा नव्याने शिका —
“जगणं म्हणजे गाणं गाणं,
ना की स्पर्धा धावणं!”
ती पुन्हा यावी...
प्रत्येक हृदयात घरटं बांधायला,
प्रत्येक नजरेत स्वप्न पेरायला,
आणि पुन्हा सांगायला —
“की प्रेम अजूनही... जिवंत आहे!”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/११/२०२५ वेळ : १३:३२
Post a Comment