कविता – धागा नाही श्वास


तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे

आयोजित

तितिक्षा काव्य लेखन स्पर्धा

(दशकपूर्ती विशेष... स्व. प्रमोद दामले यांच्या जयंती निमित्ताने)

काव्यप्रकार : मुक्तछंद

विषय : नाते बापलेकीचे

वेळ ....२२/१० पहाटे ३/४० ते (२३/१०) रात्रौ११/५५

स्पर्धा कालावधी...  २२/१०/२०२५ व २३/१०/२०२५

शीर्षक : धागा नाही श्वास

तो शब्दांनी नाही,
तर नजरेने करायचा — नि:शब्द संवाद.
लेकीच्या मऊशार बोटांत
त्याचं संपूर्ण विश्व गुंफलेलं असायचं.

घामाच्या मोत्यांनी घडवलेलं त्याचं प्रेम,
त्या मूक नात्याला आकार द्यायचं.
“आवडतेस”... असं त्याने कधी म्हटलंच नाही
पण पहिल्या चपला विकत घेताना —
त्याचे डोळे सगळं काही बोलून गेले.

त्याच्या हाताची घट्ट पकड — तिचं पहिलं सुरक्षा कवच,
आणि तिच्या लाघवी हास्यातून झळकायचं त्याचं अस्तित्व नव्याने.

ती उमलत गेली — शाळा, कॉलेज, स्वप्नं, संसार...
तो मात्र सावली बनून मागे सरकला,
तिचं आकाश निरभ्र ठेवायला.

ती म्हणायची —
“माझ्या उंच भरारीचं श्रेय तुझं आहे!”
तो मंद हसत म्हणायचा —
“अगं, मी फक्त थोडं ऊन पेरलं... प्रकाश तर तूच आहेस.”

आता तो बसतो शांत —
व्हरांड्यातल्या जुन्या झुल्यावर,
आणि तिच्या छायाचित्रात शोधतो स्वतःचं हसू.

रविवारी ती येते —
हातात प्रसाद, गालावर अश्रूंचा कोमल ठसा...
तेव्हा त्याचं वृद्धत्व पुन्हा फुलतं —
जसं पावसात पुन्हा बहरणारं झाड.

तो तिचा पहिला देव, ती त्याच्या प्रार्थनेतलं “माझं पिल्लू.”
हे नातं — धागा नाही श्वास आहे!
आणि —
“बापलेकीचं नातं — देवाघरचं गुपित खास आहे...”

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २३/१०/२०२५ वेळ : २२:५०


गुरुदा मनापासून आभार, बापलेकीचे नातं इतक्या सुंदर पद्धतीनं तुम्ही उलगडले आहे की, मला माझे वडील आठवले आणि त्यांच्या आठवणींनी डोळ्यात पाणी तरळले. जणू माझीच जन्म कथा मी पुन्हा जगत असल्याचा मला भास झाला, आणि बापलेकीचे नाते धागा नाही श्वास आहे, हे नव्याने अधोरेखित झाले. पुन्हा एकदा गुरुदादा तुमच्या लेखणीच्या प्रेमात पडले आहे. मनापासून धन्यवाद माझी सकाळ आणि दिवसाची सुरुवात इतकी सुंदर केल्याबद्दल.🙏🌹

सौ. सुनिता पांडुरंग अनभुले


प्रिय सौ. सुनिता ताई पांडुरंग अनभुले, 

आपल्या मनःपूर्वक आणि भावस्पर्शी प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🙂

माझ्या कवितेने तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आठवणींशी पुन्हा जोडले, हाच या लेखणीसाठीचा सर्वात मोठा गौरव आहे.

‘धागा नाही श्वास’ ही कविता लिहिताना मनात आलेली ती नाजूक भावना — बापलेकीच्या अबोल पण अटूट नात्याची — तुमच्या हृदयातही उमटली, हे जाणवणं अतिशय आनंददायी आहे.

आपल्या शुभेच्छा आणि प्रेमळ शब्द हेच पुढील लेखनासाठी प्रेरणादायी इंधन आहेत. 

आपली सकाळ आणि दिवस असाच हृदयस्पर्शी आणि भावमधुर जावो, हीच शुभेच्छा. 🙏🙂

स्नेहपूर्वक,

गुरुदत्त दिनकर वाकदेकर

Post a Comment

Previous Post Next Post