माझी लेखणी साहित्य मंच, आयोजित..
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
नवरात्रोत्सव माझी लेखणीचा...
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
दिवस- दहावा....
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
उपक्रम दि. १ ऑक्टोबर २०२५
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
विषय - सुनबाई वेगळ्या घराचा हट्ट सोड...
(लेख लेखन - ५०० शब्दात)
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
वेळ- सकाळी ७ ते रात्री ११:३० वाजेपर्यंत...
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
सुनबाई वेगळ्या घराचा हट्ट सोड...
लग्नानंतर सुनीता आणि तिचा नवरा विक्रांत मुंबईतील गजबजलेल्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले. विक्रांत सतत कामानिमित्त बाहेरगावी असायचा, त्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या सुनीताच्या खांद्यावर पडल्या. सकाळी उठून स्वयंपाक, कपडे धुणे, घरातील लहानसहान कामे, सासू-सासरे यांचा आजारपण पथ्य पाणी – तिचा दिवस ह्याच धावपळीत निघून जात असे. त्या सततच्या धावपळीच्या जीवनात सुनिताला स्वतःसाठी वेळ मिळत नसे; मानसिक थकवा वाढत होता आणि घरातले वातावरणही तणावपूर्ण बनत होते. प्रत्येक दिवस संपल्यावर ती फक्त थकतच नव्हती, तर मनःशांती देखील हरवत होती.
एका संध्याकळी तिने विक्रांतशी मनसोक्त संवाद साधला. “विक्रांत, मी सतत घर सांभाळत आहे, पण मला माझ्यासाठी वेळ हवा आहे. माझी छोटी-मोठी स्वप्ने मागे पडली आहेत. मला वाटत नाही की ह्या घरात आणि वातावरणात ते शक्य होईल.” ती शांत पण ठाम स्वरात म्हणाली. विक्रांत सुरुवातीला गोंधळला; “अगं पण, आई-वडिलांची जबाबदारी आपल्याकडे आहे, तुला स्वतःसाठी वेळ हवा, हे मान्य पण म्हणून त्यांना सोडायचं कसं?” सुनीताने स्पष्ट केले, “मी त्यांची जबाबदारी टाळत नाही, पण माझा थकवा आणि मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. मला स्वतःसाठी थोडा वेळ हवा, तरच मी घर सांभाळताना अधिक उत्साही राहू शकते. पण मला वाटतं, मला हवा असलेला वेळ या घरात मिळणार नाही. म्हणूनच आपण हे घर सोडूया.” तिचे हे शब्द सासू-सासर्यांना बाहेरच्या खोलीतही ऐकू आले आणि त्यांचे मन थोडे हलले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सासू-सासरे तिच्या खोलीत आले. सासुबाई हसत म्हणाल्या, “सुनबाई, आम्ही तुझ्यावर दबाव आणत नाही. तुला स्वतःसाठी वेळ हवा हे समजतो. घर सांभाळताना थोडा आराम असला पाहिजे. तुला आराम मिळावा, तुझ्या छंदासाठी वेळ मिळावा, ह्या खूपच माफक अपेक्षा आहेत. इतक्या छोट्याशा कारणासाठी तू वेगळ्या घराचा हट्ट सोड.” सुनीताला जाणवले की सासू-सासर्यांना तिच्या भावना समजत आहेत आणि तिने उगाचच खूप टोकाचा विचार केला होता. त्या क्षणी तिने ठरवलं की घर सोडायची गरज नाही, पण स्वतःसाठी वेळ राखणे गरजेचे आहे.
सुनीताने दिवसाचा काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवला – पुस्तक वाचन, हलके व्यायाम किंवा फक्त शांत बसून मेडिटेशन करणे. विक्रांतही आता दौरे कमी करून तिच्यासाठी वेळ राखून ठेवू लागला. हळूहळू घरातले वातावरण हलके आणि प्रेमळ झाले, तणाव मिटला, आणि सुनीताला जाणवले की संवाद, समजूत आणि एकत्रिततेमुळे घर अधिक सुखकर बनू शकते. ती आता स्वसंवेदनशीलतेसह घर सांभाळू लागली आणि प्रत्येक कामात आनंद अनुभवू लागली.
काही महिन्यांनी एका संध्याकाळी सासू-सासरे विक्रांतसह तिच्या जवळ आले. “तू घर सोडलं नाहीस आणि आता तू स्वतःसाठी वेळ घेऊ शकतेस, तुझ्या समजूतदारपणामुळे आणि एका चांगल्या निर्णयामुळे आज आपण सगळे एकाच छताखाली आनंदाने राहत आहोत,” सासुबाई असं बोलताच सुनीताच्या डोळ्यांतून हलकेच आनंदाश्रू ओघळले; तिला समजले की घर म्हणजे फक्त भिंती नव्हत्या, तर प्रेम, समजूत आणि एकत्रिततेची जागा होती. त्या दिवशी तिच्या हृदयात एक नवीन समाधान, प्रेम, आणि आपुलकीची उर्मी निर्माण झाली, आणि ती समजून चुकली की हे घर तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी कायम प्रेम आणि सौख्याचे ठिकाण राहील. सासू-सासर्यांचं ऐकून तिने स्वतःसाठी जागा राखली आणि तेच खरे सामर्थ्य आहे – एकत्र कुटुंबात राहूनही मनाची मोकळीक मिळवणे आणि सुखी संसार मांडणे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०२/१०/२०२५ वेळ : ०२:१६
Post a Comment