मुंबईतील देवीची मंदिरे – श्रद्धेचे अमृतधाम
धावपळीची तमा नाही नगर गजबजलेले,
मायेच्या सावलीला तरीही मन आसुसलेले,
समुद्राच्या लाटांवर जणू मंत्र सजलेले,
मुंबईच्या मंदिरांत देवीस्वर गुंजलेले।
मुंबई… ही स्वप्नांची, आशांची, धडपडीची नगरी! इथे येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या हृदयात एक अव्यक्त श्रद्धेचा दीप जळतो, जणू जीवनाच्या प्रत्येक क्षणाला देवीच्या अनंत कृपेची छाया लाभावी, अशी ती आंतरिक आस. डोळ्यांत स्वप्नं, हातात आशा, पायांत थकवा घेऊन पोहोचणारा प्रत्येक जण एका अदृश्य शक्तीच्या कवचाखाली जगतो आणि ही शक्ती म्हणजे या नगरीच्या प्रत्येक कोपऱ्यात, गल्लीत, बाजारात, डोंगरकड्यांवर विराजमान देवी. गगनचुंबी इमारतींच्या सावलीत, समुद्राच्या लाटांच्या साक्षीने, मुंबईतली ही मंदिरे भक्तांना आश्रय देतात, जीवनाला दिशा देतात आणि अंतरंगाला गहन शांतता देतात.
मुंबईच्या हृदयात उभे असलेले महालक्ष्मीचे मंदिर हे केवळ समृद्धीचे प्रतीक नाही, तर श्रद्धा, सौंदर्य, संस्कार आणि जीवनशक्तीचे अधिष्ठान आहे. अरब सागराच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर सकाळच्या किरणांत जसे चमचमतं, तेव्हा जणू समुद्राच्या लाटाही देवीच्या चरणस्पर्शासाठी स्पर्धा करत आहेत असा भास होतो. भक्त जेव्हा "अंबे माते की जय" या घोषात हरवतो, तेव्हा केवळ बाह्यतेचा आनंद नव्हे, तर अंतर्मनातील समृद्धीची अनुभूती होऊ लागते. सोन्याचा कळस, फुलांच्या सजावटीत न्हालेला गाभारा, धुपाचा सुवास, घंटानादात थरथरणाऱ्या भिंती—ही सर्व दृश्यं केवळ वैभव दाखवत नाहीत, तर भक्ताच्या मनात देवीच्या अनंत कृपेची गूढ अनुभूती जागवतात.
महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली—या त्रिदेवता एकत्र दर्शन देतात आणि प्रत्येक भक्ताला जाणवतं की जीवनाच्या त्रिविध प्रवासात ह्या त्रिमूर्तीच आपल्याला आधार देतात. स्थापत्यदृष्टीने हे मंदिर प्राचीन असून, त्यातील शिल्पकला, नक्षीकाम, उंच शिखर आणि कलात्मक गाभारा भक्ताला बाह्य वैभवात गुंतवून ठेवत नाही; उलट, अंतरंगातील दिव्यता, भक्तिचा गहन अनुभव आणि जीवनसिद्धीची जाणीव जागवतो.
महालक्ष्मीच्या मंदिरात प्रवेश करताना भक्त जणू काळ आणि स्थळ विसरून जातो; येथे प्रत्येक पायरी, प्रत्येक कोपरा, प्रत्येक मूर्ती भक्ताला जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवासाचे दर्शन घडवते. मंदिरे फक्त वास्तू नाहीत, तर भक्तांच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत. मंदिरातील नक्षीकाम, कलात्मक शिखर, रंगीत आरास—हे सर्व तत्वज्ञानाच्या सूक्ष्म अर्थाने गुंफलेले आहेत. भक्ताच्या अंतरंगाला समृद्धी, श्रद्धा आणि आत्मविश्वास देणारे हे मंदिरे अनुभवत असताना जणू जीवनातील प्रत्येक संकट सोपं होत चालल्यासारखं वाटतं.
मुंबईच्या मध्यभागी, गर्दीच्या गजबजाटात लपलेलं मुंबादेवीचे मंदिर हे जणू शहराचं हृदय आहे. या नगराचं नाव जिच्यामुळे पडलं—मुंबादेवी! बाजारपेठेची लगबग, व्यापाऱ्यांचा कलकलाट, वाहनांचा गोंधळ—सर्व काही मंदिराच्या पायऱ्यांवर थांबतो. पाऊल टाकताच भक्ताला आईच्या कुशीत शिरल्यासारखी निश्चिंती मिळते. काळ्या दगडात कोरलेली करुणामय मूर्ती भक्तांच्या वेदना ऐकते, अंतःकरण हलकं करते. "माझ्या मुला, तू एकटा नाहीस"—या कटाक्षातले प्रेम अनेकांच्या जीवनाला नवं बळ देतं. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा पाया जणू या मातृदेवीच्या आशीर्वादावरच उभा आहे. मूळ मंदिर १३व्या शतकात बांधले गेले असल्याचे सांगितले जाते आणि कोळी समाजाच्या श्रद्धेशी ते घट्ट जोडलेले आहे.
सिद्धिविनायक परिसरदेखील देवीच्या कोमल स्पर्शाने भक्तांना आल्हादित करतो. गणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरात महालक्ष्मीची आराधना केली जाते. नवरात्रात फुलांचा वर्षाव, रंगांची उधळण, फुलांच्या सजावटीने गंधाळणारा गाभारा, भक्तगणांचा जयजयकार—हे सर्व वातावरण भक्तिरसाने भारुन टाकते. भक्ताच्या ओठांवरील जयघोष, हातातील फुलमाला, मनातील श्रद्धा—या सर्वांचा संगम जणू मंदिराच्या दारात प्रवेश करताच भक्ताला दिव्य अनुभूती देतो.
मुंबईच्या कोळी, आगरी, कुंभार, शेतकरी समाजाचं हृदय ज्या देवीशी घट्ट जोडलेलं आहे ती म्हणजे एकवीरा देवी. कार्ल्याच्या डोंगरावर वसलेलं हे मंदिर जणू भक्ती आणि कष्टाचं शिखर आहे. पायऱ्या चढताना प्रत्येक श्वासात देवीचं नाव उच्चारलं जातं. दम लागला तरी ओठांवरचा जयघोष थांबत नाही, कारण माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारं दर्शन शब्दातीत असतं. सागराच्या पसरलेल्या जलाशयाकडे नजर टाकताना, एकवीरेच्या डोळ्यांत डोळे मिळवताना भक्ताला जाणवतं की हीच खरी जननी, हीच खरी शक्ती. मंदिराची दगडी रचना, गाभाऱ्याची गंभीरता आणि माथ्यावरून दिसणारा विहंगम नजारा भक्ताला आयुष्याच्या संघर्षावर मात करण्याची शिकवण देतो.
बाणगंगा परिसरातील मंदिरे मुंबईच्या प्राचीनतेची साक्ष देतात. दुर्गादेवी व इतर देवीमंदिरांमध्ये पाऊल टाकताच काळ जणू थांबतो. सरोवराच्या पवित्र जलाशी जोडलेली ही मंदिरे, जिथे साधक-भक्त शतकानुशतकं साधना करत आले, आजही भक्तांना शांतीची अनुभूती देतात. मंदिरांच्या प्राचीन दगडी भिंती, मंडप-रचना, जलाशयातील प्रतिबिंब—हे सर्व भक्ताला आत्मशुद्धीचा अनुभव देतात, मनाला अंतरंगातील शांतता लाभते.
अंधेरीतील जोगेश्वरी देवीचं मंदिर (इ.स. ५वा-६वा शतक) देखील अतिशय प्राचीन आहे. खडकात कोरलेल्या गुहेतील भव्य मूर्ती भक्तांना काळाच्या ओघातही आकर्षित करते. गुहेतील थंडगार शांततेत देवीचं तेजोमय अस्तित्व अनुभवताना भक्ताला जगाच्या गोंगाटापासून वेगळी ऊब लाभते. स्थापत्यशास्त्रानुसार जोगेश्वरीच्या मंदिराचा वास्तुशिल्प शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे, जिथे खडकाच्या निसर्गसौंदर्याशी वास्तूचे सुसंवाद साधण्यात आले आहे. भक्त ज्या ठिकाणी तशी शांतता आणि दिव्यता अनुभवतो, ती जीवनातील वैराग्य, मनाची निर्मळता आणि भक्तिचा उच्चतम स्तर अनुभवण्यास सक्षम करते.
परळमधील बारादेवी पुरातन मंदिर मुंबईत अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आणि शिल्पाकृतीपैकी एक आहे. अकरा फुटी उंच आणि ५ फूट रुंदीच्या दगडावर बारा मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. या मंदिराला पुरातन वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्य शिवप्रतिमेतून आणखी सहा प्रतिमा उद्भवताना दाखवल्या आहेत. मध्यभागी असलेल्या सर्वोच्च मूर्तीला चार हात असून इतर सर्व अर्धमूर्ती व मूर्तींना दोन हात दाखवले आहेत. या साऱ्याच मूर्तींनी छोटे मुकुट परिधान केलेले असून नागादि लांछनेही पाहायला मिळत आहेत. अशा बारा मूर्तींमुळे या शिल्पपटाला स्थानिकांनी बारादेवी असे नाव दिले आहे. ही वास्तुशिल्पे भक्ताला केवळ भव्यतेचा अनुभव देत नाहीत, तर अंतरंगाला आत्मविश्वास, श्रद्धा आणि जीवनसिद्धीची अनुभूती देतात.
मुंबईत नवरात्र म्हणजे भक्तिरसाचा महासागर! प्रत्येक गल्ली, चौक, सभामंडप, मंदिर सजतात. डोल-ताशांचा निनाद, जागरण-गोंधळाचे स्वर, वाऱ्यावर हेलकावणारी फुलांची माळ, आरतीच्या नादात थरथरणारी अंतःकरणं—हे दृश्य पाहून मन भारावून जातं. स्त्रिया देवीची ओव्या म्हणतात, पुरुष भजनी मंडळींसोबत दांडिया खेळतात, लहान मुलं फुलं गोळा करून देवीच्या चरणी अर्पण करतात. संपूर्ण मुंबई भक्तिसागरात बुडाली जाते. पारंपरिक गीतं, लावणीसदृश भक्तिगीतं, जागरण गोंधळ, सजावटीतून व्यक्त होणारी कलात्मकता—हे सगळं नवरात्राला फक्त उत्सव न राहता सामूहिक साधना आणि ऐक्याचा अनुभव बनवते.
देवीच्या मंदिरांचे वैशिष्ट्य केवळ पूजा नाही, तर जीवनालाही दिशा देणे आहे. व्यापारी सकाळी मुंबादेवीला प्रणाम करतो, समुद्रात मासेमारीसाठी जाणारा कोळी एकवीरेचा आशीर्वाद घेऊनच जाळं टाकतो, विद्यार्थी महालक्ष्मी व सरस्वतीकडे ज्ञानासाठी प्रार्थना करतो, संकटग्रस्त स्त्री देवीच्या चरणी आसरा शोधते. ही मंदिरे मुंबईच्या माणसाला शिकवतात—“कष्ट कर, पण श्रद्धा सोडू नको.”
मुंबईतील देवीची मंदिरे फक्त दगडात घडवलेल्या वास्तू नाहीत, तर भावनांचे, श्रद्धेचे, जीवनसिद्धीचे सजीव केंद्र आहेत. भक्ताला देवी आई, आधार, सखी, मार्गदर्शक म्हणून भेटते. नवरात्रातील उत्सव भव्य असला तरी, दैनंदिन साध्या प्रार्थनेतून मिळणारा तिचा कोमल स्पर्श अधिक गहिवरून टाकतो.
आज मुंबईची ओळख शेअर बाजार, चित्रपटसृष्टी, उद्योग-धंदे यापुरती मर्यादित नाही. तिच्या गाभाऱ्यात अजूनही हृदयाचा ठोका जपणारी ही मंदिरे आहेत. गगनचुंबी टॉवर्समध्ये राहणारा उच्चभ्रू असो वा रेल्वे स्थानकावर दिवस घालवणारा मजूर असो—दोघांनाही मंदिरांत समान आसरा मिळतो. हाच देवीच्या महिमेचा खरा चमत्कार आहे.
मुंबई ही नगरी जणू एका अदृश्य मातेच्या कवचाखाली आहे. महालक्ष्मीची समृद्धी, मुंबादेवीची मातृछाया, एकवीरेची शक्ती, जोगेश्वरीची स्थैर्यशक्ती, तुळजाभवानीचं धैर्य आणि सरस्वतीचा ज्ञानदीप—या सर्वांनी या शहराला ओळख दिली आहे. लोकांच्या मनातील भय, चिंता, असुरक्षितता दूर करून धैर्य, श्रम, श्रद्धेची उर्जा निर्माण करणारी ही मंदिरे म्हणजेच मुंबईच्या आत्म्याचे दिव्य प्रतिबिंब आहेत.
आजही संध्याकाळच्या वेळी, आरतीच्या वेळेला जेव्हा समुद्रावर सोनेरी किरण पसरतात आणि मंदिरांत घंटानाद गुंजतो, तेव्हा संपूर्ण मुंबई जणू एक सुरात म्हणते— "जय देवी, जय देवी महिषासुरमर्दिनी…" त्या निनादात संपूर्ण जीवन क्षणभर थांबतं, स्थिरावतं आणि देवीच्या चरणी लीन होतं.
“आई, तुझ्या चरणी वंदन,
संसाररूपी समुद्रात आधार तुझा साधन।
महालक्ष्मी, मुंबादेवी, तुळजाभवानी, जोगेश्वरी,
तुझ्याच कृपेवर उभी ही नगरी अमुची सारी॥”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २९/०९/२०२५ वेळ : ०४:२३
Post a Comment