कविता – विसर्जन


कविता – विसर्जन 

बाप्पा येतात आनंद देण्यासाठी,
आपण मात्र देतोय प्रदूषणाचा वारसा.
स्वप्नांवरच पाणी ओतत,
उद्याच्या पहाटेचं करतोय विसर्जन.

नदी-समुद्र झाले समाधीस्थळ,
फुलांचे सौंदर्य झाले मृत्यूचे आवरण.
श्वासासाठी तडफडणारे मासे
जणू करताहेत निसर्गाची याचना.

बाप्पा शिकवतात शांती-संतुलन,
आपण मात्र गमावतो शहाणपण.
ढोल-ताशांच्या गजराखाली दडतो,
धरणीचा रडका आर्त श्वास.

किती सोपे आहे खरं तर जगणं,
मातीच्या मूर्तींनी सण सजवणं.
नैसर्गिक रंगांनी सौंदर्य फुलवणं,
धरतीला पुन्हा जीवनदान देणं.

भक्तीचा अर्थ आहे संरक्षण,
प्रेमाचा अर्थ आहे संवर्धन.
नावापुरते "पर्यावरणपूरक" नको,
खोटे खेळ आता थांबवूया.

आज निर्णय घ्यायची वेळ आली,
विसर्जन नको आशेचं,
विसर्जन नको निसर्गाचं.
निसर्गच आहे खरी देवता,
त्याच्याशीच जोडूया जीवनाचं नातं.

चला म्हणूया गणपती बाप्पा मोरया,
मातीच्या शुद्धतेतच भक्तीचं खरं सार जपूया.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०६/०९/२०२५ वेळ :१४:१३

Post a Comment

Previous Post Next Post