लेख– साहित्य क्षेत्राला साठमारीची लागण
साहित्य क्षेत्रातील साठमारी हा एक नवा विषय नाही. हा वाद नेहमीच कुठल्या ना कुठल्या स्वरूपात डोकं वर काढतो. साहित्य म्हणजे मुक्त विचारांची अभिव्यक्ती, तर साठमारी म्हणजे व्यक्तिस्वार्थी, गटबाजी आणि अहंकारातून निर्माण होणारे संघर्ष. या दोन्हींच्या टोकांवरून साहित्यविश्वात अस्वस्थता पसरते. ज्या साहित्याने माणसाला माणुसकीचे धडे द्यायचे, त्याने जर मत्सर, हेवेदावे, संघर्ष आणि विखारी वातावरण निर्माण केले तर त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो.
साहित्यिकांचे काम म्हणजे समाजाच्या वेदना, आनंद, संघर्ष, प्रश्न आणि भविष्यदृष्टी शब्दांत पकडणे. साहित्य समाजाचा आरसा मानला जातो. परंतु जेव्हा साहित्यिकच व्यक्तिस्वार्थ, गटबाजी, पुरस्कारप्राप्तीची स्पर्धा आणि व्यक्तिगत प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झगडतात, तेव्हा साहित्याचा मूळ हेतू बाजूला राहतो. हे केवळ लेखकाचे नुकसान नसते, तर संपूर्ण वाचकवर्गाचा विश्वास डळमळीत करणारे ठरते.
आजकाल अनेक साहित्य संमेलने, काव्यसंमेलने, साहित्यिक गट व मंच स्थापन झाले आहेत. काही मंच खरोखरच साहित्याच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत, तर काही मंच केवळ स्वतःच्या गटातील व्यक्तींना पुढे नेण्यासाठी झटताना दिसतात. परिणामी, ज्यांना खरी प्रतिभा आहे ते मागे पडतात आणि ज्यांना पाठबळ आहे ते वरच्या स्थानी दिसतात. या अन्यायामुळे नवोदित कवी-लेखकांचा उत्साह कमी होतो. अनेक तरुण लेखक या अनुभवामुळे साहित्याकडे पाठ फिरवतात. हे साहित्यविश्वासाठी धोकादायक आहे.
आजच्या काळात सोशल मीडियामुळे साहित्याला मोठं व्यासपीठ मिळालं आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांवर शेकडो साहित्यगट अस्तित्वात आले आहेत. या गटांमुळे नवोदितांना लिहिण्याची संधी मिळते. त्यांचे लेखन त्वरित वाचकांपर्यंत पोहोचते. परंतु याच ठिकाणी गटबाजी, एकमेकांची टीका, मत्सर आणि वादविवादही वाढलेले दिसतात. काही वेळा सृजनशील चर्चेऐवजी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडतो. यामुळे साहित्यिक मूल्यांना धक्का बसतो.
याउलट काही साहित्यिक खरोखरच एकमेकांच्या लेखनाला प्रोत्साहन देतात, चांगल्या गोष्टींचं कौतुक करतात. असे सकारात्मक दृष्टिकोन असलेले गट साहित्याला नवी दिशा देतात. साहित्यवर्धनासाठी आवश्यक असणारी परस्पर सन्मानाची भावना ज्या गटांमध्ये टिकून आहे, तिथे खरी साहित्यसंपदा निर्माण होते. म्हणूनच गटबाजीच्या अंधारापेक्षा सहकार्याच्या प्रकाशाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.
अनेकदा साहित्य संमेलने ही प्रतिष्ठेची ठिकाणं ठरतात. कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला व्यासपीठ द्यायचं, कोणाच्या कवितांना वाचक दाद देणार, यावरून कुरघोडी सुरू होते. साहित्य हे एक आध्यात्मिक कार्य मानलं जातं, ते राजकारणाच्या पातळीवर नेणं योग्य नाही. साहित्यिकांनी स्वतःला विद्वान समजून घेतलं, पण जर तेच राजकारण्यांप्रमाणे मत्सर आणि गटबाजी करत असतील तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याचा धोका वाढतो.
साहित्यिकांच्या लेखणीमधून प्रेम, सहिष्णुता, करुणा, समाजातील सत्यस्थिती आणि परिवर्तनाचा विचार यायला हवा. त्याऐवजी जर कटुता, मत्सर, अपशब्द, टीका-टिप्पणी वाढली तर साहित्यातील पवित्रता हरवते. वाचकांचा विश्वास तुटतो आणि जेव्हा वाचक दूर जातो तेव्हा साहित्यिकांची लेखणीही निर्जीव होते.
आज गरज आहे ती साहित्यविश्वात समतेची भावना टिकवून ठेवण्याची. प्रत्येक लेखकाच्या लेखणीत दडलेली मौलिकता शोधण्याची. प्रतिभेला संधी देण्याची. पुरस्कार, संमेलन, व्यासपीठ या गोष्टी दुय्यम आहेत. खरी प्राथमिकता हवी ती चांगल्या विचारांची. साहित्याने लोकांना एकत्र आणावं आणि विभाजन करू नये.
साहित्याने आपल्याला विचार द्यायला हवेत, दिशा द्यायला हवी. त्यात जर राजकारण, मत्सर, गटबाजी आली तर साहित्याचा दर्जा खालावतो. साहित्य हे समाजाचं भान जागं ठेवणारं एक प्रभावी साधन आहे. त्याची ताकद टिकवून ठेवणं हे प्रत्येक साहित्यिकाचं कर्तव्य आहे.
नवीन पिढी लेखनात उतरते आहे. त्यांच्या मनात उत्साह आहे, पण त्यांना योग्य वातावरण मिळालं नाही तर त्यांचा विश्वास ढासळेल. म्हणून आजच्या ज्येष्ठ साहित्यिकांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून नवोदितांना मार्गदर्शन करायला हवं. साहित्यातील खरी परंपरा ही स्पर्धेची नसून सहप्रवासाची आहे.
साहित्याच्या इतिहासात अनेकदा असे संघर्ष झाले आहेत, पण त्यातूनच नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. संत साहित्य, भक्ती साहित्य, स्वातंत्र्यलढ्यातील साहित्य – सर्वत्र मतभेद झाले, पण शेवटी त्या मतभेदांवर मात करून साहित्याने समाजाला दिशा दिली. आज पुन्हा तशीच वेळ आली आहे. एकमेकांच्या प्रतिभेचा सन्मान करून, सहिष्णुतेने पुढे गेलं तर साहित्याची खरी उंची गाठता येईल.
शब्द हे शस्त्र नाही, ते औषध आहे. शब्दांनी जखम करायची नाही, तर मनं जिंकायची आहेत. साहित्यिकांनी जर हे भान जपलं तर साठमारीची गरजच भासणार नाही.
साहित्य हे माणसाला माणूस जोडण्याचं आणि जीवनाला प्रकाश देण्याचं सामर्थ्य आहे. गटबाजी, मत्सर आणि साठमारीने हे पवित्र कार्य कलुषित होतं. म्हणूनच साहित्यिकांनी स्वार्थाच्या कवचातून बाहेर पडून सर्जनशीलतेच्या दीपज्योतीभोवती एकत्र यावं, हाच खरीखुरा साहित्याचा विजय आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :०६/०९/२०२५ वेळ:१७:११
Post a Comment