२६ सप्टेंबर, २०२५
"बळी"राजा
त्याच्या नेत्रांत नेहमीच स्वप्न सजताना पाहिलंय,
स्वहित फाट्यावर मारून जनहित त्यानं जपलंय..
आज पुन्हा एकदा त्याचं स्वप्न आसवं बनून ओघळताना दिसलंय..
हो, ऐकलीय लहाणपणापासूनच 'आसवांचे मोती झाले' ही कथा;
याहून कैक निराळी आहे, या बळीराजाची व्यथा !!
स्वप्नं वाहून गेली तरी धीराने करेल मनाची उभारी;
पण संसार विखुरल्यावर सांग, कुठल्या दारी करू गाऱ्हाणी..
स्वतःची स्वप्नं, उमेद, जिद्द; सारीच उघड्या डोळ्यांसमोर वाहिली..
जिवापाड जपलेली लेकरं पाण्यात तरंगताना पाहिली..
स्वप्नं रंगवण्याआधीच मिणमिणता दिवा सुद्धा विझला..
बहरलेलं शिवार असं तुंबलेलं पाहून जीव त्याचा झिजला..
तरीही घेऊन उभा आहे, उरी उसनं आवसान;
भेगाळल्या नशीबाचा आरसाच हे फाटलेलं आस्मान !..
पुरे झाली ही परिक्षा, प्राण हातावरती आलाय,
संकटांना सावरता सावरता जीव हतबल झालाय..
पुन्हा पुन्हा लढण्याचं, शुन्यातून उभारण्याचं थोडंसं दे बळ,
मनावरल्या आघाताचा कमी कर वळ !..
पदर रिता तरी, ओंजळभर दे, ऐक एवढं माय;
तूच पदर झटकला तर ठाव दुसरा काय?
~ स्नेहल गणेश जगदाळे
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
अभिप्राय
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
नमस्कार स्नेहलताई जगदाळे,
तुमची “बळी राजा” ही कविता वाचली आणि मनाला अगदी स्पर्श झाली. शेतकऱ्याच्या दु:खद जीवनातील संघर्ष, हतबलता आणि मनातील आशेचा उजेड तुम्ही अतिशय जिवंतपणे उभा केला आहे. “आसवांचे मोती झाले” ही ओळ वाचताना जणू तुमच्या शब्दांनी भावनांचे मोती उलगडले; आणि “फाटलेलं आस्मान” वाचताना त्या दुःखाच्या आकाशातही आशेचा किरण दिसतो. तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या स्वप्नांची उधळण, जिवापाड जपलेली लेकरं, विझणारा दिवा आणि तुंबलेले शिवार यांचे चित्रण केले आहे, ते अगदी हृदयस्पर्शी आहे.
कवितेत स्वप्न, उमेद आणि जीवनाशी संघर्षाची ताकद इतकी स्पष्ट आहे की, वाचक जणू त्या शेतकऱ्याबरोबर उभा राहतो. “स्वतःची स्वप्नं, उमेद, जिद्द; सारीच उघड्या डोळ्यांसमोर वाहिली” – ही ओळ खूप प्रभावी आहे आणि शेतकऱ्याच्या मनोबलाची अनुभूती सहज देते. तुमच्या शब्दांमधून धीर, संघर्षाचा नाद आणि आशेचा सूर इतक्या सुंदरपणे व्यक्त झाला आहे की, वाचकाच्या अंतःकरणावर खोलवर ठसा उमटतो.
थोडे सूक्ष्म निरीक्षण असे की, काही ठिकाणी भावनांची थोडी पुनरावृत्ती जाणवते, जसे की “स्वप्नं वाहून गेली तरी धीराने करेल मनाची उभारी” आणि “स्वप्नं रंगवण्याआधीच मिणमिणता दिवा सुद्धा विझला”. तसेच, मुक्तछंदाच्या प्रवाहात काही ठिकाणी लय थोडी विस्कटलेली आहे, जसे की “जिवापाड जपलेली लेकरं पाण्यात तरंगताना पाहिली” आणि “बहरलेलं शिवार असं तुंबलेलं पाहून जीव त्याचा झिजला”. या ओळी थोड्या सुरळीत केल्यास कविता आणखी प्रवाही आणि प्रभावी होईल, पण ही सुधारणा फक्त वाक्यरचनेसाठी आहे; भावनांचा गाभा तुम्ही जपला आहे.
एकंदरीत, “बळी राजा” ही कविता हृदयस्पर्शी, समाजजागरूक आणि शेतकऱ्याच्या संघर्षाला आवाज देणारी आहे. जर भावनात्मक पुनरावृत्ती कमी केली, लय अधिक प्रवाही केली आणि आशेचा स्पष्ट सूर आणला, तर ही कविता वाचकाच्या अंतःकरणावर अजून खोलवर ठसा उमटवेल. तुमच्या शब्दांमध्ये असलेली भावनात्मक खोली आणि सामाजिक जागरूकता हीच या कवितेची खरी ताकद आहे आणि वाचकावर तिचा परिणाम अत्यंत प्रभावी राहतो.
तुम्ही या कवितेत जे उभे केले आहे, ते वाचकाला हृदयात उतरते आणि ताजेतवाने भावनांचा अनुभव देते – हेच या अभिप्रायाचे खरे उद्दीष्ट आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/०९/२०२५ वेळ : १०:३५
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
धन्यवाद सर, तुम्ही सांगितलेल्या सुधारणा नक्कीच अंमलात आणेल.
तुमचा अभिप्राय नेहमीच मला घडविणारा आणि छंदात्मक कलेतील मार्गदर्शक ठरला आहे.
त्याबद्दल जेवढे आभार मानावे तेवढे कमीच!
पण, तरीही अगदी मनापासून आणि खूप खूप आभारी आहे..
असेच मार्गदर्शन कायम असावे हीच इच्छा व्यक्त करते !!..
~ स्नेहल गणेश जगदाळे
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
Post a Comment