कविता – गोष्ट इथे संपत नाही
कथेच्या पानांवर...
शेवटचा शब्द उमटला तरी...
भावनांचे दरवाजे
अर्धवट उघडेच राहतात.
तुटलेल्या आरशातले
प्रतिबिंब जरी विखुरले,
तरी प्रत्येक तुकड्यात
एक चांदणी लुकलुकत राहते.
आठवणींच्या राखेतून
नव्या स्वप्नांची पालवी फुटते,
विरहाच्या गडद काळोखातूनही
पहाटेचा किरण हळूच डोकावतो.
शेवट म्हणजे
थांबलेली पायवाट नव्हे,
तो तर पुढे उमलणाऱ्या
नव्या शक्यतांचा दरवाजा आहे!
तुटलेपण म्हणजे नाश नाही —
ते नव्या संगतीचं बीज आहे;
जिथे नदीचा प्रवास थांबतो...
तिथूनच समुद्राची गाथा सुरू होते!
श्वास जरी थांबले,
तरी आठवणींच्या सावल्यांत
जगण्याची ज्योत
अखंड प्रज्वलित राहते!
गोष्ट इथे संपत नाही…
कारण प्रत्येक अश्रू
उद्याच्या आशेचा मोती आहे
आणि पहाटेच्या प्रत्येक किरणात
नव्या स्वप्नकथेचं आभाळ सजतं!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०९/२०२५ वेळ : ११:०७
Post a Comment