कविता – रोजचा उत्सव
तुझे येणे… तुझे जाणे…
क्षणांच्या खेळात,
काळाच्या कुशीत गुंफलेले…
आम्ही करतो सजावट,
दिवे लावतो, मोदक बनवतो,
पण तू फक्त एकमेव,
अनादी, अनंत, शाश्वत।
आम्ही तुला आणतो, बसवतो,
दाखवतो नैवेद्य, विसर्जित करतो…
तरीही तू उरतो प्रत्येक हृदयात,
तू राहतो काळाच्या पलिकडे,
तू राहतो पिढ्यांच्या मागे, पिढ्यांच्या पुढे…
का मोदकांचा गंध, दिव्यांचा प्रकाश,
फक्त दहा दिवस अनुभवावा?
का रोज नव्याने, नव्याने तुझे स्वागत न करावे?
माझे येणे… माझे जाणे…
क्षणभंगुर हे जगणे…
त्यातच खरी आराधना,
त्यातच खरी प्रीती,
खरी भक्ती, खरी उर्जा…
मनाची आरास घालावी,
करावी प्रेमाची उधळण,
दाखवावा सत्याचा नैवेद्य,
फुलवावी दया, क्षमा, शांतीची फुले…
आरती करावी सुंदर शब्दांची,
क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावेत,
हिशोब करावा भावनांचा,
उत्सव साजरा व्हावा रोजच्या जीवनाचा…
रोज नव्याने तुला मनी जागवावे,
रोज नव्याने तुला अनंतसारखे अनुभवावे,
आपल्या प्रत्येक क्षणातील,
अखंड आणि शाश्वत प्रेमाचा,
आनंदाचा, भक्तिरसाचा उत्सव करावा…
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :२०/०९/२०२३ वेळ : २०:२५
Post a Comment