कविता – जिवंत वेदना
मन मेलेलं... तरी आत्मा जिवंत...
दु:खद आठवणींच्या सावल्यांत...
ही श्वासांची ज्योत...
गडद अंधारातही फुलत राहते…
तू विचारलंस—
“तू ठीक आहेस का?”
मी हसून म्हणालो...
हो, मी ठीक आहे…
फक्त तुझ्या शुभेच्छांच्या उबेत...
हा जीव अजूनही श्वास घेत आहे…
स्मित हास्याचा नाजूक प्रकाश,
थोडेसे सांत्वनाचे गोड शब्द…
मनास कोमल झुळूक बनून स्पर्शतात,
तरीही अंतरंगाच्या खोल काळोखात
मी अजून ठाम उभा आहे…
एकाकी आयुष्यात,
शून्याच्या स्पर्शातही स्पंदतो आहे.
विरहाच्या तीव्र जखमांतूनही...
मी गोडवा शोधतो...
वेदनांच्या धगधगत्या राखेतूनही...
आशेचे गुलाब उगवते...
आणि जीवन नव्याने उजळते…
तुझ्या शुभेच्छांच्या आश्रयाने
ही जिवंत आठवण पुन्हा उमलते.
मन मेलेलं, पण आत्मा अजूनही तेजस्वी,
वेदनांची ही अविरत कविता
तुझ्या आठवणीतून अखंड वाहते…
आणि सांत्वनाच्या सावलीतून...
सप्तरंगांच्या दिव्य प्रकाशात
ती कानात कुजबुजते—
हो... मी अजून... जिवंत आहे…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०३/०९/२०२५ वेळ :०७:२९
Post a Comment