चित्रपट समीक्षण : दशावतार : परंपरेचा गंध, लोककलेची ताकद
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच लोककला, परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यांना आपल्याकडे सामावून घेतलं आहे. दशावतार हा चित्रपट त्याच प्रवाहातील परंतु वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारा आहे. कोकणातील लोकप्रिय लोकनाट्यप्रकार दशावतार हा इथे केवळ कलाप्रकार म्हणून दाखवलेला नाही, तर श्रद्धा, नैतिकता आणि समाजजीवनाशी नातं सांगणारा जिवंत वारसा म्हणून उलगडला आहे.
कथानकाचा गाभा बाबुली मिस्त्री (दिलीप प्रभावळकर) या दशावतारी नटाभोवती फिरतो. आयुष्य कलेला अर्पण केलेला हा कलाकार वयोमानामुळे दुर्बल झाला आहे; तरीही अवतारधारणेच्या ओढीपासून तो दूर जाऊ शकत नाही. प्रभावळकरांनी बाबुलीच्या डोळ्यांतली आसक्ती, संवादातील जिद्द आणि रंगमंचावर उलगडणारा रुद्रावतार इतक्या ताकदीने साकारला आहे की प्रेक्षक भारावून जातात.
त्यांचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) पित्याच्या हट्टाला तर्कशुद्ध प्रतिसाद देतो. काळजी, राग, प्रेम आणि असमंजसपणा यांचा संगम त्याच्या भूमिकेत दिसतो. काही ठिकाणी गती मंदावते, तरी पितापुत्र नात्याचा भावनिक ताण दोघांनीही प्रामाणिकपणे व्यक्त केला आहे.
इन्स्पेक्टर मायकेल डोकोस्टा (महेश मांजरेकर) गावातील गडद वास्तव आणि सत्तेचं प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या आवाजातली धार आणि देहबोली चित्रपटाला वेगळं टोक देतात. लक्ष्मण वाडेकर (भरत जाधव) नेहमीच्या विनोदी छटेत रंग भरतो; तर वंदना (प्रियदर्शनी इंदलकर) ग्रामीण स्त्रीजीवनाचा सच्चा स्पर्श देते. आबा तांडेल (रवी काळे) यांचा भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा ठसा जाणवतो. मॉंटी सरमळकर (अभिनय बेर्डे), मंत्री अशोक सरमळकर (विजय केंकरे) आणि पोलीस पाटील परब (सुनील तावडे) यांनी आपापल्या भूमिकेने लक्ष वेधलं आहे.
याशिवाय, स्थानिक कलाकारांनी साकारलेले अवतार नाट्यविशेष उल्लेखनीय आहेत. उदा. नरसिंह, वामन, वराह, राम-रावण युद्ध, तसेच मत्स्यावताराच्या प्रसंगांमध्ये स्थानिक रंगकर्मींचा अभिनय आणि नृत्यशैली प्रेक्षकांना खऱ्या लोकनाट्याचा अनुभव देतात. त्यांचा सच्चेपणा हा चित्रपटाचा प्राण आहे.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी लोकनाट्याची परंपरा आणि आधुनिक संघर्ष यांची सांगड उत्तम घातली आहे. त्यांची दृश्यरचना आणि अवकाशाचा वापर परिपक्वतेचं दर्शन घडवतो. विशेष म्हणजे, दिग्दर्शकाने केवळ नाट्य दाखवण्यावर भर न देता त्यामागची सामाजिक-धार्मिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. मात्र, पटकथेत काही दृश्यांचा ताण जाणवतो. गावकुसातील राजकारण आणि वादांवरील प्रसंग जर थोडक्यात घेतले असते, तर कथानक अधिक धारदार झालं असतं.
गीतकार गुरू ठाकूर यांनी साकारलेली डॉक्टरची व्यक्तिरेखा तसेच संवाद लेखन हा चित्रपटाचा ठळक पैलू आहे. संवादांमधील म्हणी, उपरोध आणि भावनिक टोक प्रेक्षकांना भिडतात. गाण्यांपैकी “आवशीचो घो माझ्या करू तेचा काय…” हे गाणं गावजीवनाच्या भावविश्वाला अगदी नेमकं पकडतं. तसेच भक्तिरसाने भारलेलं एक गाणं आणि युद्धछटेसाठी रचलेला वीररसप्रधान पद्यांश कथानकाला बळकटी देतात. तरी काही गाणी थोडी जास्त वेळ खेचली गेल्याने गती मंदावते.
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी पारंपरिक वाद्यांचा जिवंत वापर केला आहे. ढोल, ताशा, तुतारी आणि हार्मोनियम यांच्या सुरांनी लोककलेचं वातावरण अनुभवायला मिळतं. भक्तिरस, करुणा आणि वीररस या सर्व छटा संगीतामधून समरसून येतात. पार्श्वसंगीत काही ठिकाणी संवादांवर जड झालं असलं तरी एकंदर परिणाम प्रभावी आहे.
छायाचित्रकार देवेंद्र गोलतकर यांनी कोकणची निसर्गसंपन्नता पडद्यावर अप्रतिम पकडली आहे. हिरव्यागार रानातले देव-दानव युद्धाचे प्रसंग, समुद्रकिनाऱ्यावर उलगडलेलं मत्स्यावताराचं दृश्य आणि मंदिरे-रंगभूमीवरील प्रकाशयोजना हे विशेष उल्लेखनीय आहेत. निसर्ग हा इथे केवळ पार्श्वभूमी नसून कथानकाचा सह-नायक वाटतो. संकलक फैजल महाडिक यांनी कथानकाचा धागा साधारण नीट सांभाळला आहे, जरी काही ठिकाणी प्रसंगांचा अवधी अधिक वाटतो.
रंगभूषा, मेकअप आणि वेशभूषेच्या दृष्टीने चित्रपट ठाम उभा आहे. बाबुलीच्या रुद्रावतारातला मेकअप, वेशभूषा आणि मुकुट-आभूषणांची भव्यता प्रेक्षकांना भारावून टाकते. मात्र काही ग्रामीण पात्रांची वेशभूषा अधिक वैविध्यपूर्ण दाखवली असती, तर वास्तवदर्शी परिणाम अधिक गडद झाला असता.
चित्रपटाची सकारात्मक बाजू — प्रभावळकरांचा अभिनय, स्थानिक कलाकारांचा सच्चेपणा, संवादांची ताकद, गीतांची लोकसंगीताशी असलेली सांगड, छायाचित्रणाची मोहकता आणि दिग्दर्शनाची संवेदनशीलता. असं असलं तरी काही उणिवा — पटकथेत काहीसा सैलपणा, प्रसंगांचा ताण, गाण्यांचा अवधी आणि अधूनमधून जड वाटणारं पार्श्वसंगीत.
एकूणच दशावतार हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नसून सांस्कृतिक अनुभव म्हणून बघावा असाच आहे. कारण मोठ्या पडद्यावरच लोकनाट्याची भव्यता, कलाकारांची उर्जा, निसर्गाची मोहकता आणि श्रद्धेची तीव्रता पूर्णतेने अनुभवता येते. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघावा — तेव्हाच या कलेचं खरं सौंदर्य आणि आत्मा आपल्याला अनुभवायला मिळेल.
चित्रपट: दशावतार (२०२५)
निर्माते: सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर
लेखक-दिग्दर्शक: सुबोध खानोलकर
संवाद- गीत: गुरू ठाकूर
कलाकार: दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल आणि इतर
संगीत: ए. व्ही. प्रफुलचंद्र
छायांकन: देवेंद्र गोलतकर
संकलन : फैजल महाडिक
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :१३/०९/२०२५ वेळ : ०४:०५
Post a Comment