तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५
तितिक्षा भावार्थ सेवा संस्था अंतर्गत", "तितिक्षा इंटरनॅशनल पुणे" व "सोल्युशन माईंड" आणि "भारतीय विचारधारा"" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५ स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक : ५
विषय : नारळी पौर्णिमा
शीर्षक : स्नेहबंधांचा सण
सागरपुत्रांच्या श्रद्धेचा,
नारळी पौर्णिमेचा सण आला।
नारळ वाहून सागराला,
रक्षणाचा मान त्याला दिला।
धुपारतीचा सुगंध दरवळे,
शिडात वारा बेफाम शिरतो।
शंखध्वनी लाटांवर नाचतो,
सागरही क्षणभर थरथरतो।
मच्छीमारांच्या जिवाभावाचा,
तो दर्यादेव आज पूजिला।
भावभक्तीचा साज चढवूनी,
नमन जल कुबेरा अर्पिला।
धीरगंभीर लाटांत लहरी,
श्रीफळ वाहून साद घालती।
“सागरराजा, हो कृपावंत,”
“रक्षण करा” – हेच विनवती।
नारळ विश्वासाने वाहिला,
हस्त जोडुनी केले अर्पण।
त्या सागरातच गुंतले जीवन,
त्याच जीवनाचे तेच कारण।
भाऊ बहिणीचाही सण आला,
भाऊ हसतच हात पुढे करतो।
हातात राखीचा रेशीमधागा,
मायेचा बंध पुन्हा घट्ट होतो।
प्रेमाचे बंध, नात्यांचे सूर,
नात्यांची ही कोमल वीण।
साठवतो स्नेह अनमोल,
हे नाजूक, अविस्मरणीय क्षण।
भाऊ बहिणीच्या डोळ्यांत,
आपुलकीचा झळकतो प्रकाश।
मनात उमलता राखीचा गंध,
पवित्रतेचा राहो सुवास।
श्रावणातली ही पौर्णिमा,
बंध श्रद्धेचे पूज्य ठरते।
वृत्ती, दृष्टी शुद्ध करणारे,
स्नेहबंधन मनात भरते।
स्त्री असो वा नात्यांची वीण,
आधी मान–आदर दे तूच।
भगीनीरूप प्रत्येक नात्यात,
स्नेहगंध हृदयात राहो असाच।
सण असा प्रेमाच्या नात्यांचा,
नारळाचा आणि सागराचा।
निसर्ग, बंध, श्रद्धा, प्रेम,
नारळी पौर्णिमा सण आपुलकीचा।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०८/२०२५ वेळ : १४:१३
Post a Comment