कविता – बडीशेप – काळाचा गंध
कधी एखाद्या लहानशा दाण्यात
तुम्ही संपूर्ण आयुष्याचा आस्वाद घेतलाय का?
जिभेवर पडताच...
क्षणांना मधुरतेची चव देणारा,
आणि आठवणींना सुगंधाचं वस्त्र चढवणारा…
एक लहानशी हिरवी शेंग,
ओंजळीत विसावताच
काळाच्या प्रवाहालाच बांध घालते…
जणू वाळूच्या कणांत
दडलेली गूढ चांदणी.
त्या चांदणीत…
ऋतूंची सर आहे,
पिढ्यांचा श्वास आहे,
आणि आयुष्याची
गोडसर, अदृश्य कहाणीही आहे.
बाहेरून — साधेपणाचं कवच.
आतून — नजरेआड साठवलेलं प्रेम.
ते उघडायला लागतं,
फक्त एक उबदार हास्य.
बालपणात—
आईच्या हाताचा मृदू स्पर्श...
वडिलांच्या खिशातून सांडलेला
एक चिमुकला मधाळ क्षण...
तरुणपणी—
पहिल्या रेल्वे प्रवासात
गप्पांमध्ये मिसळलेला
सुगंधी उसासा.
काळ पुढे सरकताना...
वार्धक्यात—
आठवणींच्या माळेत
शेवटचा उजळणारा मणी.
आणि बडीशेप हळूच सांगते—
काळ गोल आहे...
क्षणांचा परिमळ गुंफत राहणारा,
जिथून तू सुरू होतोस,
तिथेच परत आणणारा...
पण तुझी ओळख...
तुझ्या मागे रेंगाळते,
काळाच्या कोमल ओंजळीत.
म्हणून...
हा क्षण गोड करून जग,
जेणेकरून तुझं अस्तित्व
तू नसतानाही जाणवत राहील.
आणि मग...
बडीशेपेच्या त्या दाण्यात
तुला जाणवेल —
तू हीच एक बडीशेप आहेस...
काळाच्या मखमली मिठीत,
क्षणांच्या पाळण्यात विसावलेली.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :१०/०८/२०२५ वेळ : ०२:२५
Post a Comment