कविता — शब्द शून्य सोबती

कविता — शब्द शून्य सोबती

कधी वाटतं —
ज्याच्यासोबत काळ थांबावा,
त्याचं अस्तित्वच
क्षणार्धात विरून जातं...

ज्यांनी मनाला,
सावलीसारखी साथ दिली,
तेच एक दिवस
श्वासातून हरवून जातात...

प्रेम, शब्द, स्पर्श,
क्षणांचे कोवळे स्पंदन—
सगळं सामावून घेणारं
एक हसू — तेच शेवटचं ठरतं...

ज्यांना आपण देवदूत समजतो,
ते खरंच कधीतरी 
काही कळण्याआधीच 
देवांप्रमाणेच
अलिप्त होऊन निघून जातात...

त्यांची आठवण
आठवणीतच राहते,
शब्दांच्या पलिकडची,
स्पर्शालाही न सापडणारी...

आणि मग उरतो तो —
एक धूसर चेहरा,
त्यांच्या हास्याचं प्रतिबिंब,
मनाच्या आडवळणावर उसवलेलं...

"दुरावा" ही
कधीकधी शेवटची भेट असते,
आणि "आठवण" —
एकटेपणाच्या वाटचालीतील 
शब्द शून्य सोबती...

@गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०४/०८/२०२५ वेळ : ०८;०१

Post a Comment

Previous Post Next Post