कविता – गणरायाचे आगमन
आरतीच्या धुरात…
उगवते सुवर्ण प्रभात…
ढोल–ताशांच्या निनादात…
आकाशही थरथरतं!
कणाकणांतून… श्रद्धेचा उत्सव फुलतो—
गणराया, जेव्हा तू येतोस!
तुझ्या आगमनाने—
अंध:कारावर प्रकाशाचा विजय होतो,
निराशेच्या सावल्या विरघळतात…
आणि प्रत्येक मनात
नव्या आशेचा, नव्या उमेदेचा दीप पेटतो!
मोदकाच्या गोडीत…
आईच्या मायेचा गंध भरतो,
तुझ्या डोळ्यांतून
आश्वासक विश्वाचा सागर लहरतो,
ज्यातून आत्मविश्वासाचे मोती
भक्तांच्या ओंजळीत साचतात.
तू आहेस—
गुंतागुंतीची गाठ सोडवणारा,
वादळातही दीपस्तंभ होणारा,
मार्ग हरवलेल्या जीवाला
सुरक्षित किनाऱ्यापर्यंत पोहोचवणारा…
विघ्नहर्ता!
कधी तू लाडका बालगणेशा—
चाफ्याच्या पाकळ्यांत खेळणारा…
तर कधी विराट रूपाने
ग्रह-नक्षत्रांच्या पलीकडूनही
आशीर्वादाची किरणं पसरवणारा!
गजमुखा, आज तुझ्या पावलांनी
घराघरातलं प्रत्येक हृदय
एक तेजोमय दीपगृह बनलंय…
जेथून शांतता, सौख्य, समृद्धीचा प्रकाश
सदैव झळकत राहतो!
या गजरात दुमदुमू दे—
भविष्याची आशा,
विश्वासाची गोडी,
आणि… नवजीवनाची सुरूवात!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/०८/२०२५ वेळ : ०८:४६
Post a Comment