कविता – मातीची माऊली


वारसा साहित्य मंच आयोजित वारसा साहित्य मंचाचे सचिव ज्ञानदेव डिघुळे (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा

विषय : शेतीमाती

काव्यप्रकार : मुक्तछंद

शीर्षक : मातीची माऊली

धरणीच्या कुशीतली अनमोल माया खुलणार आहे,
शेतकऱ्याच्या घामातून जगणे फुलणार आहे।

उन्हातही हिरवीगार स्वप्ने रानात डोलणार आहे,
पावसाच्या सरींनी आशेचा साज चढणार आहे।

नांगराच्या फाळावर अंकुर नवा उमलणार आहे,
गोंडस त्या कोंबांनी भविष्य उजळणार आहे।

बैलगाडीच्या चाकांत गाणी श्रमांची उमटणार आहे,
कडब्याच्या ढिगाऱ्यात समाधान नांदणार आहे।

चांदण्यातल्या शिवारात चाफा दरवळणार आहे,
पाखरांच्या गाण्यांनी दिवस नवा उजाडणार आहे।

पहाटेच्या दवबिंदूत सोनचाफा उमलणार आहे,
मातीच्या स्पर्शातून जीवन गंध पसरणार आहे।

गुराख्यांच्या स्वरांनी गोकुळ गाऊ लागणार आहे,
कृष्णाच्या बासरीने शेतकरी हृदय फुलणार आहे।

विहिरीच्या काठाशी आई गाणी गाणार आहे,
बाप घाम गाळून घर संसार सजवणार आहे।

देवळातील घंटा बैलांशी सूर जुळवणार आहे,
धरतीच्या अंगणी भक्तिभाव बहरणार आहे।

कष्टांची साधना सोनसाखळीचे रूप घेणार आहे,
मातीची माऊली जीवन घडवणार आहे।

शेतीमातीच्या कुशीत माझे ध्येय गुंफणार आहे,
“गुरुदत्त”चे गीत ह्या धरणीवर गुंजणार आहे।

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २३/०८/२०२५ वेळ : ०८:३७

Post a Comment

Previous Post Next Post