कविता - निसर्गाची हाक
प्रस्तावना:
🙏 नमस्कार!
"निसर्ग वाचवा" हा केवळ एक प्रचार नाही…
तो एक श्वास आहे, जाणीव आहे, जबाबदारी आहे.
आज मी सादर करत आहे, एक अशी कविता…
जिच्यात निसर्ग स्वतः आपल्या लेकरांशी संवाद साधतोय.
हटके नाही, आक्रस्ताळं नाही –
फक्त एक हलकीशी, पण थेट हृदयाला भिडणारी हाक…
कवितेचं शीर्षक आहे – "निसर्गाची हाक"
झाडं लावण्याची गरज नाही,
फक्त झाडं तोडू नका.
ती स्वतः उगवतात,
स्वतःची काळजी घेतात,
सावली, फळं, फुलं देतात –
फक्त त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.
नदी स्वच्छ करायची गरज नाही,
ती वाहते... तीच तिचं पाणी स्वच्छ करते.
फक्त तिच्यात कचरा टाकून
तिच्या पवित्र प्रवाहात विटाळ करू नका.
शांतता प्रस्थापित करायची गरज नाही,
कारण ती आधीपासूनच इथे आहे –
पक्ष्यांच्या किलबिलाटात,
वार्याच्या सळसळीत,
फक्त तुम्ही
तुमच्या बेसूर गोंगाटाचा आवाज थोडा कमी करा.
प्राणी वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही,
निसर्ग त्यांचं रक्षण करतो.
फक्त तुम्ही त्यांना मारू नका,
जंगलं जाळू नका,
त्यांच्या हक्काची जागा हिरावू नका.
जग सुधारण्याच्या नादी लागू नका,
सृष्टी आधीपासूनच सुंदर आहे.
सूर्य उगवतो, पाऊस पडतो,
पक्षी आकाशात उडतात,
फुलं निसर्गाच्या कुशीत फुलतात.
फक्त तुम्ही स्वतःला सुधारा –
कारण जेव्हा तुमच्यात योग्य बदल होईल,
तेव्हा तुम्हांला हे जग सुंदर वाटेल.
निसर्ग हलक्या स्वरात सांगतोय –
"माझी काळजी करू नका रे लेकरांनो,
मी समर्थ आहे...
पण आता तुमचं हे बेताल वागणं
माझ्या सहनशक्तीच्या सीमारेषा ओलांडतंय."
फुलांमध्ये, पानांमध्ये,
पावसाच्या सरींमध्ये,
समुद्राच्या गाजेमध्ये,
मी एकच शांत विनवणी करतो –
"फक्त…
फक्त तुम्ही नका होऊ माझे शत्रू…"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०७/२०२५ वेळ : ०५:४४
Post a Comment