कविता — हिशेब
प्रस्तावना
कधी वाटतं…
आपण आयुष्यभर फक्त देतच आलो...
वेळ, प्रेम, क्षमा, समर्पण —
आणि शेवटी उरलं काय?
एक वही…
रिकामी की ओझ्याने भरलेली?
हाच ताळेबंद मांडणारी —
"हिशेब".
हिशेब
मोजता मोजता संपली जीवनगणती...
कधी प्रेमाच्या धाग्यांत गुंतलो,
कधी ऋणांच्या जाळ्यात अडकत गेलो.
जगणं झालं होतं एक वाणिज्य —
भावनांचं, नात्यांचं, स्वप्नांचं...
आणि मी?
सदैव देणं देणारा —
अर्पण करणारा,
न थकता, न थांबता...
मी उभा राहिलो दुःखांच्या उंबऱ्यावर,
चकार शब्द न उच्चारता,
अनंत अपूर्णतांना समजून घेतलं.
ज्या मार्गाने प्रवास केला,
त्याच मार्गावर ओझंही वाहिलं...
मृत्यू तू दारात येण्याआधी,
मला फेडायचं होतं सारं कर्ज —
आणि हातात रिकामी वही घेऊन,
तुला शांतपणे विचारायचं होतं —
"सर्व हिशेब फिटले का?"
कारण,
मोकळं मरायचं होतं मला —
निर्लेप, नि:स्पृह, नि:शब्द...
पण जाता जाता
एक शेवटचा प्रश्न अजूनही छळतोय —
"माझ्या जगण्याची
खरंच किती होती किंमत?"
पण आता,
हिशेब मांडले गेले आहेत.
सारे श्वास तटस्थपणे शांत झालेत.
मनाच्या वहीत शेवटी लिहिलं आहे —
"शांतताच उरली शेवटी — बाकी काही नाही."
कधी कधी…
हिशेब फेडण्यासाठी पैशांची गरज नसते...
फक्त मन मोकळं असणं पुरेसं असतं.
...आणि शेवटी उरतं एकच उत्तर —
"शांती."
© गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०७/२०२५ वेळ : ०७:२०
Post a Comment