कविता - पदराच्या पल्याड

तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, आयोजित "तितिक्षा आई काव्यलेखन करंडक स्पर्धा"

स्व. सुहासिनी प्रमोद दामले यांच्या जन्मदिना निमित्ताने, भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन करंडक स्पर्धा २०२५

स्पर्धा दिनांक : २० जुलै २०२५

वेळ पहाटे ३:४० ते रात्री ११:५५

विषय : आई

शीर्षक : पदराच्या पल्याड
 
ती स्फटिकासारखी शांत असते, 
पण डोळ्यांत वादळ झुरते। 
ओठ न हलवता बोलते मनाशी, 
अन् मायेचे आभाळ उधळते॥
 
जणू चंद्राची मूक सावली, 
पावलांगणिक वाट उजळते। 
ती नसली तरी देहामध्ये, 
श्वासांसवे तिची साथ लाभते॥
 
दिवस रात्र मायेचा गंध, 
श्वासांतून वाहत राहतो। 
आई हा केवळ शब्द नाही, 
हृदयात मी खोल जपतो॥
 
तिचा पदर आभाळमाया, 
ओंजळ शब्दांनी सजलेली। 
भाकरीतली मूक प्रार्थना, 
भुकेच्या थाळीत ओतलेली॥

दुखापतीच्या जखमा साऱ्या, 
ओठांनी अलगद झाकते। 
एका हळुवार फुंकरीने, 
औषधांचेही काम करते॥
 
नजर हरवता शून्यात, 
तिचा हलका स्पर्श लाभतो। 
शब्द विरले तरी चित्रातून, 
“मी आहे...” हा दिलासा देतो॥
 
अगदी शांतपणे समजावते, 
पदराने मग डोळे पुसते। 
तिच्या मिठीत विरघळते मन, 
ममतेची जपणूक होते॥
 
ती गेली तरी मी नाही एकटा, 
ती अजूनही हृदयात वसते। 
स्मृतींच्या मार्गावर चालताना, 
तिच्या पावलावर पाऊल पडते॥

पदराच्या पल्याड अजूनही काही,
शब्दांत न मावणारी तिची छाया।
तिच्या स्पर्शाच्या आठवणींमध्ये,
माझं पूर्ण आयुष्य सामावाया॥
 
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २०/०७/२०२५ वेळ : ०६:५७

Post a Comment

Previous Post Next Post